केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या हजरजबाबी वृत्ती आणि किश्श्यांमुळे कायमच चर्चेत असतात. गडकरी आपल्या भाषमांमध्ये त्यांच्याबाबत घडलेले अनेक किस्से सांगताना दिसतात. नितीन गडकरींच्या कार्यपद्धतीवर सगळ्यांकडूनच कौतुकाची थाप पडते. विकासकामं करून घेताना गडकरींचा प्रशासनावर आणि कंत्राटदारांवर वचक असल्याचं त्यांच्या भाषणांमधून आणि कार्यपद्धतीतून सहज दिसून येतो. नुकतंच त्यांनी सांगलीमध्ये केलेलं एक भाषण याचसंदर्भात चर्चेत आलं आहे. या भाषणादरम्यान नितीन गडकरींनी केलेलं विधान हे कंत्राटदारांसाठी इशारा मानलं जात आहे. त्याआधी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात गडकरींनी सांगितलेला किस्साही असाच चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“…तर मिशा काढून टाकेन”

पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी धीरूभाई अंबानींसमवेत घडलेला एक किस्सा सांगितला. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाच्या निविदे प्रक्रियेमुळे धीरूभाई अंबानी हे नितीन गडकरी यांच्यावर नाराज झाले होते. ३६०० करोड रुपयांची निविदा असताना गडकरी यांनी ती निविदा प्रक्रिया रद्द केली होती. यामुळे नाराज झालेल्या अंबानी यांनी “१८०० करोड रुपयांमध्ये तुम्ही महामार्ग बनवू शकत नाही” असे म्हणत सुनावले होते. नितीन गडकरींनी देखील “मी हा रोड तेवढ्याच पैशांमध्ये बनवून दाखवणार, तसे न झाल्यास मी माझ्या मिशा कापेन” असे आव्हान धीरूभाई यांना दिले होते. मात्र, “द्रुतगती मार्ग अवघ्या दोन वर्षात तो ही अवघ्या सोळाशे कोटी रुपयात बनवून दाखवला. धीरूभाई अंबानी यांनी मी हरलो तुम्ही जिंकलात असे मान्य केले होते”, असं गडकरी या कार्यक्रमात म्हणाले.

“२५ वर्षं एकही खड्डा पडणार नाही असा रस्ता होईल”

सांगलीमध्ये नितीन गडकरींनी एका रस्ते उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना २५ वर्षं एकही खड्डा पडणार नाही, असा रस्ता तयार होईल, असं आश्वासन दिलं. “या रस्त्याचं भूमीपूजन न करता काम सुरू करा अशा सूचना मी दिल्या होत्या. ही गोष्ट खरी आहे की या रस्त्याचा त्रास खूप झालाय. सगळ्यांनी मला याचा त्रास सांगितला आहे. जमीन अधिग्रहण वगैरेमुळे रस्ता लांबत गेला. या रस्त्यावर ८६० कोटी खर्च होणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिन्याभरात कामाला सुरुवात होईल. पुढची २५ वर्षं या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही असा हा मजबूत रस्ता होईल असा विश्वास मी देतो”, असं नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी यांनी धीरुभाई अंबानी यांना दिलं होत चॅलेंज; वाचा संपूर्ण किस्सा

“मी ठेकेदारांना नेहमी सांगतो की..”

“मी नेहमी ठेकेदारांना सांगतो की तुमच्याकडून मी माल खात नाही. देशात कुणीही ठेकेदार असा नाही की ज्याच्याकडून मी कधी एक रुपयाही घेतलाय. त्यामुळे कामात गडबड केली तर तुम्हाला बुलडोझरखालीच टाकेन. त्यामुळेच पुढची ५० वर्षं या रस्त्याला काही होणार नाही हे मी विश्वासाने सांगतो. कारण ९६-९७ साली आपण काँक्रिटमध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधला. आज २६-२७ वर्षं झाली. पण त्या रस्त्यावर खड्डा नाही. माझ्या मतदारसंघात नागपूरला ५५०-६०० किलोमीटर काँक्रीट आहे. नागपुरात तुम्ही पावसाळ्यात कधीही या,तुम्हाला कधी खड्डे दिसणार नाहीत”, असं गडकरी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari warns contractors on road construction work pmw
First published on: 28-01-2023 at 09:41 IST