सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत. तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी, सभासद नोंदणी अभियान राबवून पक्षाची ध्येयधोरणे सर्व कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करावी, असे आवाहन खा. नितीन पाटील यांनी केले.
सातारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक जिल्हा कार्यालयात झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, कार्याध्यक्ष संजय देसाई, महिला कार्याध्यक्षा सीमा जाधव, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, प्रदेश युवक उपाध्यक्ष मनोज देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, युवती प्रदेश संघटिका स्मिता देशमुख, सातारा तालुकाध्य संदीप चव्हाण, किसनवीर कारखान्याचे संचालक सचिन जाधव, माजी उपाध्यक्ष अरविंद कदम, ज्येष्ठ नेते बबन साबळे, माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, इंद्रजीत ढेंबरे, माजी तालुका अध्यक्ष शशिकांत वाईकर उपस्थित होते.
खा. नितीन पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात आणखी मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत पक्षाचे संघटन मजबूत व्हायला हवे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचा ठसा आहे. तो इथून पुढेही कायम ठेवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.