मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमध्ये सुरू केलेल्या विकास योजनांमुळे राज्याचे रोजगार हमी योजना व जलसंधारणमंत्री नितीन राऊत हेही प्रभावित झाले असून, आपल्या कृषी विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत डोंगरमाथ्यावर फळबाग लागवड करावी, तसेच बिहार पद्धतीप्रमाणे काम करण्याचा सल्ला त्यांनी शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत दिला. तसेच मुक्त विद्यापीठात आयोजित लघुसिंचन व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत त्यांनी राज्यात दुसऱ्या टप्प्यात पंधराशे साखळी सिमेंट बंधारे बांधण्यात येतील, अशी माहिती दिली.
आढावा बैठकीस या वेळी आ. माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी विलास पाटील उपस्थित होते. या वेळी राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम, सामाजिक, वनीकरण, वन विभाग, कृषी विभाग इत्यादी विभागांच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीस कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक एम. एस. पन्हाळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मुक्त विद्यापीठात आयोजित लघुसिंचन व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत राऊत यांनी राज्यात पहिल्या टप्प्यात पंधराशे साखळी सिंमेट बंधारे तयार करण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्यातही तेवढेच सिमेंट बंधारे बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी अंदाजे ४०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यभरातील जलसंधारण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. काम करीत असताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणीचे निरसन, अंमलबजावणी यंत्रणेत सुसूत्रता आणणे, पूर्ण झालेल्या कामांची देखभाल व सिंचन व्यवस्थापन यात आमूलाग्र बदल करून सिंचन क्षेत्रात व भूजलपातळी यात वाढ करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी मार्च २०१४ अखेर उद्घाटनासाठी उपलब्ध होणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने दुष्काळ निवारणार्थ आखलेल्या सिमेंट साखळी बंधारे योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांनी या वेळी दिले. नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता आनंद मोरे यांनी प्रास्ताविकात उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्य़ातील जलसंधारण कामाची सद्य:स्थिती, भविष्यकालीन नियोजन, पूर्ण झालेल्या कामांच्या देखभालीची योजना यांचे सादरीकरण केले. त्यानंतर राज्यातील पाच मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी जलसंधारण कामाचे सादरीकरण केले. या वेळी व्यासपीठावर जलसंधारण विभागाने प्रधान सचिव व्ही गिरीराज, उपसचिव सुनील चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.