nivrutti maharaj new controversy: अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत असून यावेळेस त्यांनी जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात किर्तनादरम्यान केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलंय. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित किर्तनाच्या कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाराजांनी करोना कालावधीमध्ये ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेऊन पास झालेल्यांना नोकरी मिळणार नाही, असं वक्तव्य केलंय. तसेच पागर देताना बुद्धी तपासली पाहिजेत असंही इंदुरीकर यांनी म्हटलंय. त्यामुळे आता यावरुन नवीन वाद सुरु झालाय.

“तीन वर्षात तुम्ही मुलाला पसायदान शिकवू शकले नाहीत. मग १६ वर्षांचा मुलगा बलात्कार करतो, १७ वर्षांचा मुलगा खून करतो त्याचं कारण काय? १८ वर्षांची पाच-सहा पोरं रात्री पोलिसांनी एकत्र पकडली तर त्यांच्या गाडीत काय सापडतं? त्यांच्या गाडीत सापडतो गावठी कट्टा, नायलॉनची दोरी, मिर्ची पावडर. का १६ वर्षांचा मुलगा का बलात्कार करतो? १७ चा मुलगा का खून करतो?,” असे प्रश्न निवृत्ती महाराजांनी किर्तनादरम्यान उपस्थित केले. किर्तनासाठी मंचावर वादकांच्या ओळीमध्ये उभ्या असणाऱ्या लहान मुलांकडे बोट करुन पुढे ते म्हणाले, “ही जी पोरं उभी आहेत ना ती गायक नाही झाली, किर्तनकार नाही झाली तरी चोर नक्की होणार नाहीत. महाराष्ट्रातील पोलीस खात जागेवर आहे म्हणून जनता जागेवर आहे.”

“जगावर आलेल्या सर्वात मोठ्या करोनाच्या संकटावर तिघांनी नियंत्रण मिळवलं. एक डॉक्टर, दुसरे पोलीस आणि तिसऱ्या सामाजिक संस्था. त्यात डॉक्टरांनी जरी केलं तरी त्यात त्यांनी थोडा टाकाटूका काढला. त्यांचं कौतुक एवढं कारायचं नाही पण ज्यांनी स्वत:चा बळी दिला त्या पोलीस खात्याचं कौतुक करा. करोना योद्ध्याचा सत्कार करायचा असेल तर पहिला पोलिसाचाच करावा. का तर स्वत:चा संसार वाऱ्यावर सोडून त्याला डांबरीवर (डांबरी रस्त्यावर) ड्युटीवर जायचंय. मुलगी म्हणाली की मला शिकवणीला सोडा. नाही गं मला कामावर जायचंय. ती बिचारी रिक्षाने जाते पण तो ड्युटीशी प्रामाणिक होऊन वेळेत पोहचत असतो. आपल्याकडे उटले नियम आहेत. खरी कष्टाची ड्युटी त्यांची आहे. त्यांना पगार कमी. ज्यांना काहीच काम नाही, त्यांना पैसाच मोजता येत नाही (एवढा पगार आहे.) सर्व्हिसवाल्यांचे (सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे) पगार हे बुद्धीवर असले पाहिजे,” असं निवृत्ती महाराज किर्तनादरम्यान म्हणाले. “एक जानेवारीला मेंदू तपासायचा. जितकी बुद्धी कमी असेल तेवढा पगार कमी करायचा. हा विनोद नाही,” असंही निवृत्ती महाराज पुढे बोलताना म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व वारकरी एकत्र आले तर देश बदलू शकतात असंही निवृत्ती महाराजांनी म्हटलं. विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं तर पुढची पिढी घडेल, असं वक्तव्यही त्यांनी किर्तनादरम्यान केलं.