Raigad Zilla Parishad election: रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणूकीपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीतही शिवसेना शिंदे गटासोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप सोबत बोलणी सुरु असून ती अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील मतभेदांमुळे महायुती होऊ शकली नव्हती. त्यामुळे सोयीस्कर युती आणि आघाडी करून निवडणूक महायुतीचे घटकपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्ह दिसत आहेत.

नगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेल्याचे पहायला मिळाले होते. महाड येथे दोन्ही पक्षातील वाद हाणामारी पर्यंत पोहोचला होता. तर खोपोलीत याच राजकीय वादातून शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची हत्या झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांसह या प्रकरणी गुन्हा करण्यात आला. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबध कमालीचे ताणले गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांमधील युतीबाबत विचारणा केली असता, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती संदर्भात चर्चा सुरू असून, ती अंतिम टप्प्यात असल्याचे तटकरे यांनी सांगीतले. नगरपालिका निवडणुकी पाठोपाठ होणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाशी युती करणार नसल्याचे स्पष्ट संकेत तटकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युती असा सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी येत्या पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असून निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होणे अपेक्षित आहे.