कराड : कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल तीन दशकांनी नगराध्यक्षपद खुले झाल्याने याबाबत एकच उत्सुकता आहे. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवसाअखेर (शुक्रवारी) नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याने कराड पालिकेतील पदाधिकारी मंडळाचा नायक होण्यासाठी कोण, कोण रिंगणात उतरणार याची आतुरता अगदीच ताणली गेली आहे.

आज शुक्रवारी (दि. १४) अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी १४ अर्ज दाखल झाले आहेत. तर, आतापर्यंत एकूण २० उमेदवारांचे २३ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. विशेष म्हणजे, निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन पाच दिवस उलटले, तरी नगराध्यक्षपदासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नसल्याने सत्ताधारी भाजप आणि अन्य पक्षांच्या नेत्यांचा गुलदस्तातील या खेळाबाबत तर्क- वितर्क लढवले जात आहेत.

शुक्रवारी दाखल झालेले प्रभागनिहाय अर्ज असे – प्रभाग ३ अ (सर्वसाधारण महिला) ज्योती अधिकराव पवार (अपक्ष), प्रभाग ४ अ (सर्वसाधारण महिला), स्वाती रमेश मोहिते (भाजप), प्रभाग ४ ब (अनुसूचित जाती) शिवाजी रामुगडे (भाजप), प्रभाग ७ ब (सर्वसाधारण) अजय अरविंद कुलकर्णी (अपक्ष), प्रभाग ८ ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग) विनायक शिवलिंग विभुते (भाजप), प्रभाग ९ अ (सर्वसाधारण महिला) विद्याराणी घन:श्याम साळुंखे (लोकशाही आघाडी कराड शहर), प्रभाग ९ ब (सर्वसाधारण) प्रताप घन:श्याम साळुंखे (लोकशाही आघाडी कराड शहर), प्रभाग १० ब (सर्वसाधारण) विक्रम राजाराम भोपते (भाजप), प्रभाग ११ ब (सर्वसाधारण) प्रसाद नरेंद्र रैनाक (भाजप), प्रभाग १३ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) स्मिता रवींद्र हुलवान (भाजप), प्रभाग १३ ब (सर्वसाधारण) निखिल प्रमोद शाह (भाजप), गिरीश बाबूलाल शाह (भाजप), प्रभाग १४ अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) प्रियांका दत्तात्रेय भोंगाळे (अपक्ष), प्रभाग १४ ब (सर्वसाधारण) महादेव बळवंत पवार (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

अरुण जाधवांचे नाव आघाडीवर

भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचे बंधू आणि माजी नगराध्यक्ष शारदा जाधव यांचे दीर अरुण जाधव यांचे नाव आघाडीवर असून, माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर व तरुण माजी नगरसेवक सुहास जगताप यांचीही नावे चर्चेत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.