मदरशांमध्ये देण्यात येणारे धार्मिक शिक्षण बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. उलट, ज्या मदरशांमध्ये विज्ञान, गणित आणि समाजशास्त्रासारखे विषय शिकवले जात नाहीत, तेथे ते सुरू करून त्यांना सरकारकडून अनुदान आणि मदत केली जाणार असल्याचे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नागपुरात आले असता विमानतळावरून ते थेट गडकरी वाडय़ावर आले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

मदरशांमध्ये सुरू असलेले धार्मिक शिक्षण बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. कुठल्याही जाती-धर्मात धार्मिक शिक्षण दिले जात असेल तर त्याला विरोध नाही. अनेक मदरशांमध्ये आज राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार समाजशास्त्र, गणित, विज्ञान यांसारखे विषय शिकवले जात नाहीत. त्या ठिकाणी आम्ही ते सुरू करून त्यांना शाळेचा दर्जा देणार आहोत. साईसंदर्भात बोलताना तावडे म्हणाले, साईचे केंद्र नागपूरला सुरू करण्याबाबत यापूर्वीच निर्णय झाला आहे. त्याबाबत समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीचा अहवालानंतर निर्णय होईल.
गडकरींशी वाडय़ावर भेट
शैक्षणिक पात्रता आणि साहित्य खरेदीच्या मुद्दय़ांवरून होत असलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले विनोद तावडे यांनी आज नागपूरमध्ये आल्यावर पक्ष नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या महालातील निवासस्थानी भेट घेतली.