ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्राने दिली. या माहितीवरून यावरून राजकीय घमासान सुरू असून, राज्यातही यावरून शाब्दिक वार-पलटवार होताना दिसत आहे. केंद्राच्या या माहितीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकेचा बाण डागला होता. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राऊत यांच्यावर टीका केली. पात्रा यांच्यानंतर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही राऊतांना सवाल केला आहे.

राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची कोणतीही आकडेवारी दिलेली नाही, असं केद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी संसदेत सांगितलं होतं. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. राऊत यांनी टीका केल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट करून राऊतांना प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा- करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी देशात एकाही मृत्यूची नोंद नाही : केंद्र सरकार

“ऑक्सीजनअभावी एकही मृत्यू झाले नाहीत, असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. मग महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात मा. उच्च न्यायालयात ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू झाला नाही, असं प्रतिज्ञापत्र दिलंय… मग राज्य सरकारवरही राऊतजी खटला भरणार आहेत का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

हेही वाचा- देशात करोनाकाळात ४० लाख अतिरिक्त मृत्यू?; ताज्या अहवालामुळे मृतांच्या सरकारी आकडेवारीबाबत नव्या वादाची चिन्हे

संजय राऊत काय म्हणाले होते?

“ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले. जे ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स घेऊन धावत होते. त्यांचा यावर विश्वास बसतो का, हे सांगायला हवं. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे,” अशी टीका राऊत यांनी मोदी सरकारवर केली होती.