परदेशातील विदेशी बँकांमधील काळा पसा भारतात परत आणणार, ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील घोषणा म्हणजे जनतेची निव्वळ दिशाभूल असून ते घोषणापत्र नव्हे तर धोकापत्र आहे, अशा शब्दांत रविवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस जाहीरनाम्याची खिल्ली उडवली.नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डी. बी. पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुगोिवदसिंग स्टेडियमवर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, हेमंत पाटील यांच्यासह मराठवाडय़ातील सहा लोकसभा मतदारसंघांतील युतीचे उमेदवार उपस्थित होते.रखरखत्या उन्हात दुपारी २ वाजता झालेल्या या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. उद्या गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना मोदी यांनी नांदेडच्या गुरुगोिवदसिंगाच्या पावन भूमीचा उल्लेख केला. वीरता, त्याग, बलिदान, चारित्र्य देणारी ही भूमी आहे. या भूमीला मी नमन करतो असे सांगत त्यांनी गुरुगोिवदसिंग आणि गुजरातचे नाते किती जवळचे आहे हे सांगितले. या स्थानिक संदर्भानंतर काँग्रेस आघाडी सरकारवर मोदींनी प्रहार केले. काँग्रेसने नुकत्याच जारी केलेल्या जाहीरनाम्यात परदेश बँकांमध्ये ठेवलेला काळा पसा भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करू, अशी हमी दिली. त्याची नरेंद्र मोदींनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत आसताना का आणला नाही, असा सवाल करून त्यांनी भाजपचे सरकार आल्यानंतर हा सर्व काळा पसा भारतात आणला जाईल व त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांसाठी केला जाईल. जे नियमितपणे कर भरतात त्यांना बक्षीस म्हणून व गरिबांच्या उपयोगांसाठी आवश्यक असणाऱ्या योजनांवर हा पसा खर्च होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत निर्भयाचे प्रकरण घडल्यानंतर काँग्रेस सरकारने एक हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. पण त्याचा वापरच केला नाही. महिलांचा मान-सन्मान याबाबतीत काँग्रेस संवेदनशून्य आहे. दिल्ली ही बलात्काराची राजधानी झाली आहे. महिला, शेतकरी, कामगार यांच्याप्रती कोणतीही संवेदना नसलेल्या काँग्रेसची साथ देणार का, असा सवाल त्यांनी करताच उपस्थितांनी ‘नाही-नाही’चा नारा दिला. बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, या समस्यांचा मी दिवसरात्र विचार करीत असताना विरोधक मात्र मोदी कसे यशस्वी होणार नाहीत, याचाच विचार करतात, असे ते म्हणाले. या सभेत मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी भाजपात प्रवेश केला.