भाजपा नेते अद्वय हिरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अद्वय हिरे यांचा शिवसेनेतला प्रवेश जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो हिरे कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत अद्वय हिरे शिवसेनेमुळे विधानसभेत पोहचू शकले नाहीत, आता शिवसेनेमुळेच ते विधानसभेत पोहचणार आहेत असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेतून कितीही बाजारबुणगे निघून गेले तरीही काहीही फरक पडत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना टोला लगावला आहे.
शिवसेना संकटात असताना हिरे आपल्यासोबत
शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रावर राज्य करेल याचा अंदाज महाराष्ट्राला येऊ लागला आहे. कुणीही बाजारबुणगे निघून गेले तरी काहीही फरक पडत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाऊसाहेब हिरे यांची संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका होती. मुंबई महाराष्ट्रासोबत असावी ही जी कठोर भूमिका ज्या प्रमुख नेत्यांनी मांडली त्यातले एक भाऊसाहेब होते. त्यांच्याच कुटुंबातले अद्वय हिरे आज शिवसेनेच्या कुटुंबात आले आहेत. शिवसेना एकसंध आहे आणि आपलं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत. तुमच्यामुळे शिवसेनेला तरूण नेतृत्व मिळालं आहे. शिवसेना तुम्ही पुढे न्याल असा विश्वास आम्हाला वाटतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अद्वय हिरेंच्या प्रवेशामुळे शिवसेनेला बळ
अद्वय हिरेंच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेला बळ मिळेल हे मी उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो. शिवसेना संकटात असताना तुम्ही आज जो प्रवेश केला आहे त्याला महत्त्व आहे. आज जो शिवसेनेचा हात तुम्ही पकडला आहात तो तुम्हीही सोडू नका आम्हीही सोडणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दादा भुसेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंची खेळी
भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दादा भुसे यांना आव्हान देण्यासाठी अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना भवन या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी शिवबंधन हातावर बांधलं. दादा भुसेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही खेळी केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे अद्वय हिरे यांनी पोस्ट केलेले मीम्स तयार करत दादा भुसे यांनी अद्वय हिरेंना डिवचण्याचं काम सुरू केलं आहे. अद्वय हिरे यांनी आज शिवबंधन हाती बांधलं आहे. त्यांनी हे शिवबंधन हाती बांधल्यावर शिंदे गटावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.
गद्दार गेले आणि हिरे आपल्यासोबत आले-उद्धव ठाकरे
आत्तापर्यंत ज्यांना आम्ही हिरे समजत होते ते सगळे गद्दार निघाले. बरं झालं गद्दार निघून गेले आणि हिरे आपल्याकडे आले असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांच्या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.