सोलापूर : बारामतीच्या मंडळींनी आजवर सगळीकडचे पाणी पळवले. तरीही पुन्हा उजनीच्या पाण्यात ते वाटेकरी होत आहेत. या मंडळींना कितीही पाणी दिले तरी त्यांची तहान भागत नाही. सगळेच आम्हाला आणि आमच्याच ताटात पाहिजे आहे, अशी त्यांची जी वृत्ती आहे. ती उर्वरित महाराष्ट्राने कायम लक्षात ठेवावी आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव न घेता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे टीका केली.

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हाती घेतलेल्या ‘जागर शेतकऱ्यांचा-आक्रोश महाराष्ट्राचा’ या अभियानाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी येथे झाला. त्या वेळी फडणवीस बोलत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माढय़ाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख, विजय देशमुख, गोपीचंद पडळकर, राम सातपुते, राजेंद्र राऊत, राहुल कुल, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते-पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

सोलापूरकरांचा विरोध डावलून उजनी धरणातील पाणी उचलून इंदापूर व बारामतीला नेण्यात येत असल्याबद्दल फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की उजनी धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्यासाठी, तर धरणाचे पाणी इतर दुष्काळी भागासाठी द्यायचे यापूर्वीच ठरले आहे. परंतु तरीही धरणातील पाणी पळवून नेण्याचा प्रयत्न होत आहे.