रत्नागिरी – “आमच्यासाठी रस्त्यावर झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. रत्नागिरी हा शिवसेना-भाजप महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि इथल्या कोकणी जनतेला कोणीही फसवू शकत नाही,” असा ठाम दावा उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केला. रत्नागिरीतील शिवसेना-भाजप महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

शिंदे यांनी कोकण आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करत, “मुंबईत गेलेला चाकरमानी कोकणवासी आजही हातात भगवा घेऊन उभा आहे,” असे सांगितले. नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेले यश आणि नाणीजमधील बिनविरोध उमेदवारी याकडे त्यांनी जनतेचा विश्वास म्हणून पाहिले.

मुख्यमंत्री असताना विकासकामांची एकही फाइल थांबवली नसल्याचा दावा करत, “एकाच मिनिटात सही केली. संकटात असताना महायुती सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहिले,” असे शिंदे म्हणाले. रत्नागिरीत विविध प्रकल्प, परदेशी गुंतवणूक आणि उद्योग येत असून रोजगारनिर्मिती हीच महायुतीची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘लाडकी बहीण’ योजनेवरून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, “आई आणि पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. त्यामुळे महिलांचे दुःख मला माहीत आहे. कितीही अडचणी आल्या तरी ही योजना बंद होणार नाही. योग्य वेळी २१०० रुपये मिळणारच.” या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले असून त्याचा अर्थव्यवस्थेला सकारात्मक लाभ झाल्याचा दावा त्यांनी केला.

देशाच्या अर्थसंकल्पात कोकणाला भरघोस न्याय मिळाल्याचे सांगत, “प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही,” असा टोला विरोधकांना लगावला. कोकणात ग्रीन हायवे, महामार्ग, खाड्यांवरील पूल, बीच कनेक्टिव्हिटी यामुळे कायापालट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांच्या आरोग्यासाठी मोफत तपासण्या, कर्करोग उपचार, वैद्यकीय सहायता कक्ष आणि बालरुग्णांसाठी विशेष उपचारांचीही माहिती त्यांनी दिली. “सगळ्यात जास्त निधी रत्नागिरीला दिला आहे,” असा दावा करत, महायुती एक टीम म्हणून काम करत असल्यामुळे महाराष्ट्र वेगाने पुढे जात असल्याचे शिंदे म्हणाले.

ही ग्रामीण भागातील निवडणूक असून ग्रामीण विकासासाठीच महायुतीचा अजेंडा असल्याचे स्पष्ट करत, “महायुतीला मत म्हणजे विकासाला मत,” असे आवाहन त्यांनी केले. “धनुष्यबाण आणि कमळाचे बटण दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या,” असे आवाहन करत शिंदे यांनी आपले भाषण संपवले.