काँग्रेस व भाजप या दोन प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्षपद त्या-त्या पक्षाच्या दोन खासदारांकडे असूनही राज्य विधान परिषदेच्या १० जागांसाठी पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत मराठवाडय़ातील काँग्रेस वा भाजपच्या कार्यकत्यार्ंस संधी मिळण्याची शक्यता दिसत नाही.
भाजप सत्तेत आल्यानंतर विधानसभा सदस्यांतून विधान परिषदेतील रिक्त होणाऱ्या जागांसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता १०पकी सर्वाधिक जागा भाजपला मिळतील. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून तीन जागा जिंकता येतात. शिवसेनेने आपल्या हक्काच्या दोन जागांसाठी पक्षाच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. भाजपच्या वाटय़ाला येणाऱ्या चार निश्चित जागांपकी एक जागा विनायक मेटे यांना देण्याचे निश्चित झाल्यास मराठवाडय़ातील भाजपच्या इच्छुकांपकी कोणाची वर्णी लागणार काय, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. पक्षाचे पदाधिकारी सुजितसिंह ठाकूर प्रतीक्षायादीत वरच्या स्थानावर आहेत. औरंगाबादचे ज्ञानोबा मुंडे हेही दावेदार असले, तरी भाजपच्या वाटय़ाची एक जागा मराठवाडय़ातीलच मेटे यांना देण्याचा निर्णय झाल्यास त्याचे गंडांतर भाजपच्या मराठवाडय़ातील अन्य इच्छुकांवर येऊ शकते.