भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गुप्त भेटीची चर्चा चालू असतानाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी निवडणूकपूर्व आघाडीची शक्यता पक्षाचे नेते व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळून लावली आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ात अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ पटेल यांच्या हस्ते शनिवारी झाला. त्यानंतर सध्याच्या राजकीय चर्चा-घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, निवडणूका जवळ असल्यामुळे अशा वावडय़ा उठणे स्वाभाविक आहे. पण आमची कॉंग्रेस पक्षाबरोबर आघाडी असून जागा वाटपाची चर्चाही चालू आहे. अशा स्थितीत रालोआशी आघाडीचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती अतिशय अस्थिर असून निवडणुकीनंतर निरनिराळ्या पक्षांच्या आघाडय़ा अपरिहार्य आहेत. गेल्या चार निवडणूका देशात निवडणुकीनंतर त्रिशंकू संसद होत असून अनेक पक्षांच्या आघाडय़ांनीच सत्ता राबवली आहे. याही निवडणुकीनंतर त्यापेक्षा वेगळे काही होणार नाही. मात्र राष्ट्रवादी कोणाबरोबर राहणार, याबाबत पटेल यांनी ठोस उत्तर दिले नाही.
राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाबाबत मागील निवडणुकीचाच फॉम्र्युला (२६-२२) कायम राहील, याचा पुनरुच्चार करुन मुंबईतील नेते काहीही म्हणत असले तरी कॉंग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचे निर्णय दिल्लीत होतात, असा टोमणाही त्यांनी मारला.