‘संभाजी’ या कादंबरीचे लेखक, तसंच माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला छत्रपती संभाजी महाराजांबाबत माहिती दिली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार झाल्याच्या नोंदी नाहीत असं विश्वास पाटील यांनी या आयोगाला सांगितलं आहे. विश्वास पाटील यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीतील एका उल्लेखाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर आयोगाने विश्वास पाटील यांना चौकशीसाठी बोलवलं. या दरम्यान ही माहिती विश्वास पाटील यांनी दिली.

मंगेश देशमुख यांनी काय तक्रार दाखल केली होती?

वढू बुद्रूक येथील अॅडव्होकेट मंगेश देशमुख यांनी तक्रार दाखल केली होती. ‘संभाजी’ या विश्वास पाटील यांच्या कादंबरीत कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा न देता गोविंद महार नावाच्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे अशी तक्रार केली होती. ज्यानंतर आयोगाने विश्वास पाटील यांना समन्स बजावले. वरिष्ठ अधिवक्ता आशिष सातपुते यांना विश्वास पाटील यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कशी करण्यात आली? मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांचा कसा छळ केला? याबाबत मी संशोधन केलं आहे.

गोविंद महार या ‘संभाजी’ कादंबरीतील पात्राबाबत विश्वास पाटील काय म्हणाले?

दरम्यान विश्वास पाटील यांना विचारण्यात आलं की तुम्ही तुमच्या ‘संभाजी’ या कादंबरीत गोविंद महार या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले असा उल्लेख कसा काय केला? त्यावर विश्वास पाटील म्हणाले की मी जे लेख वाचले होते आणि काही ऐतिहासिक माहिती वाचली त्यानंतर हा निष्कर्ष काढला होता आणि तसा उल्लेख कादंबरीत केला होता. मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या प्रत्यक्ष घटनेची कुठलीही नोंद उपलब्ध नाही.

वढू बुद्रूक या ठिकाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी

वढू बुद्रूक हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचं खेडेगाव आहे. जे कोरेगाव भीमापासून अवघ्या चार किमी अंतरावर आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. याच गावात समाधीसारखं भासणारं एक स्थळ आहे गोविंद गोपाळ मेघोजी यांची ती समाधी आहे असं सांगितलं जातं, दलित महार समुदायानुसार ही समाधी १७ व्या शतकातील आहे. वढू बुद्रूक गावातील मराठा बांधवांचा हा विश्वास आहे की त्यांच्या पूर्वजांनी ज्यांचं आडनाव शिवले आणि देशमुख असं होतं त्यांनी औरंगजेबाचे त्यावेळी दिलेले आदेश झुगारुन लावले आणि छत्रपती संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे भाग एकत्र करुन पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मात्र महार समुदायाचा दावा आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवावर गोविंद गोपाळ मेघोजी यांनी अंत्यसंस्कार केले होते.

१ जानेवारी २०१८ ला काय घडलं होतं?

वढू बुद्रूक या ठिकाणी २९ डिसेंबर २०१७ ला एक फलक उभारण्यात आला होता. ज्यावर गोविंद गोपाळ मेघोजी यांचं नाव होतं आणि त्यांनी संभाजी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख होता. या फलकावरुन वाद निर्माण होऊन १ जानेवारी २०१८ ला हिंसाचार उसळला होता. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर १० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. दरम्यान देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर विश्वास पाटील पुढे असं म्हणाले की मी लिहिलेली ‘संभाजी’ ही कादंबरी छत्रपती संभाजी महाराजाचं जीवन चरित्र आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यावर आधारीत आहे. काही काल्पनिक पात्रं या कादंबरीत मी घटना आणि संदर्भ देण्यासाठी निर्माण केली आहेत असंही पाटील यांनी सांगितलं. तसंच पाटील यांनी असंही स्पष्ट केलं की त्यांच्या कादंबरीतील गोविंद महार हे पात्र १७ व्या शतकातील सनदींनुसार लिहिलं आहे. दरम्यान वकील देशमुख यांनी हे स्पष्ट केलं की त्या काळातल्या सनदींमध्ये असा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही की गोविंद महाराने छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यानंतर आता विश्वास पाटील यांनी आयोगाकडून वढू बुद्रूक गावाच्या नोंदींच्या तपासणीसाठी वेळ मागितला. १९३० ते १९३५ च्या ७/१२ च्या नोंदी, खातेदारांची यादी, गावाचा नकाशा इत्यादींचा समावेश आहे. दरम्यान यानंतर आयोगाने पाटील यांची उलट तपासणी थांबवली आहे. १५ डिसेंबरपर्यंत सगळ्या नोंदी देशमुख यांनी सादर कराव्यात असं आयोगाने म्हटलं आहे. त्यानंतर या प्रकरणी पुढील प्रक्रिया राबवली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.