राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडील दबावाचे वेगवेगळ्या पातळीवरील प्रयत्न सुरू असले तरी महापौर तृप्ती माळवी यांनी या दबावास धूप न घालण्याचे ठरविले आहे. माळवी यांचा राजीनामा न देण्याचा पवित्रा कायम राहिल्याने राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच माळवी यांच्या कार्यक्रम व उपस्थितीवर बहिष्कार टाकण्याची चाल सत्ताधाऱ्यांनी चालविली असली तरी त्यामुळे माळवी विचलित झालेल्या नाहीत. महापौरपदाचा राजीनामा दिला की, लाचखोरीच्या प्रकरणामध्ये वाचविण्यासाठी कोणीच पुढे येणार नाही याची खात्री वाटत असल्याने आणि महापौरपदावरील अविश्वास ठराव आणणे इतक्यात सहज शक्य नसल्याचे दिसत असल्याचे माळवी यांचा कठोर पवित्रा कायम आहे. उद्या बुधवारी महापालिकेची सभा होणर असून त्यामध्ये माळवी पदाचा राजीनामा देतील अशी भाबडी आशा राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असली तरी सद्यस्थिती पाहता अपेक्षेवर पाणी फेरण्याची शक्यता अधिक आहे.
कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे. महापौरपद व उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आलटून पालटून घेण्याचे ठरले होते. राष्ट्रवादीच्या तृप्ती माळवी यांच्याकडे महापौरपद आल्यानंतर त्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात राजीनामा देण्याचे निश्चित झाले होते. मात्र माळवी व त्यांचा स्वीय सहायक अश्विन गडकरी हे दोघेजण महापालिकेत लाच घेताना पकडले गेले. माळवी यांनी अटक टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरी त्यांची त्यापासून सुटका झाली नाही. लाचखोरीचे बालंट लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यातून घाईघाईने निर्णय घेतले गेले आणि तेच आता पक्षाच्या अंगलट आले आहेत.
लाचखोरीत अडकल्यानंतर माळवी या इस्पितळात तीन दिवस दाखल झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी त्या इस्पितळात दाखल आहेत याची तमा न बाळगता त्यांच्याकडून पदाचा राजीनामा व काही महत्त्वाच्या ठरावांवर सह्य़ा घेतल्या. यावर न थांबता माळवी यांना पक्षातून काढून टाकण्यात येणारी नोटीस बजावणार असल्याचेही शहराध्यक्षांनी घोषित केले होते. खेरीज माळवी यांना कसलीही मदत करायचे राष्ट्रवादीकडून टाळले गेले. या सर्व प्रक्रियेत अगोदरच दुखावले गेलेल्या माळवी या आणखीनच अवमानीत झाल्या. आपले राजकीय-सामाजिक अस्तित्व संपुष्टात येणार आहे, तर पक्ष म्हणेल त्याप्रमाणे मान तुकवण्याऐवजी पक्षालाच कोंडीत पकडून खेळवत राहण्याचे धोरण माळवी यांनी अवलंबले आहे.
राष्ट्रवादीकडून माजी मंत्री हसन मुश्रीफ, महापालिकेतील कारभारी, नगरसेविका अशा सर्वानी माळवी यांना कधी धाकदपटशा दाखवत तर कधी समजुतीचा सूर आवळत राजीनामा देण्यास सांगितले असले तरी माळवी मात्र त्याला अद्यापही बळी पडलेल्या नाहीत. उलट राजकारणात मुत्सद्दी म्हणवल्या जाणाऱ्यांची तोंडे बंद कशी राहतील याची चाल त्या करीत राहिल्या आहेत. त्यांचा राजीनामा मिळत नाही तोवर राष्ट्रवादीच्या नेत्यांना, कारभाऱ्यांना व नगरसेवकांनाही काहीच करता येत नाही. परिणामी त्रस्त झालेल्या नगरसेवकांनी माळवी या महापालिकेतील कोणत्याही कार्यक्रमाला आल्या की तेथून पळ काढून त्यांना एकाकी ठेवण्याचा बहिष्काराचा मार्ग अवलंबला आहे. उद्या बुधवारी महापालिकेची सभा होत असून यावेळी तरी माळवी पदाचा राजीनामा देतील असा उसना आव आणला जात आहे. पण राजकारणाच्या खुनशी प्रवृत्तीला विटलेल्या माळवी काही झाले तरी राजीनामा द्यायचा नाही या मनस्थितीत असल्या तरी राष्ट्रवादीचे महापालिकेतील राजकारणाचे काटे उलटय़ा दिशेने फिरत आहेत.