विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ तारखेला लागला. परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा विजय झाला त्यांनी भाजपाच्या उमेदवार आणि त्यांची चुलत बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव केला. यानंतर गुलाल उधळून, पेढे वाटून परळीत आनंद साजरा करण्यात आला. धनंजय मुंडे प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्याविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणा सुरु होताच धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना थांबवलं आणि पंकजा मुंडेंविरोधात काहीही घोषणा द्यायच्या नाहीत असं बजावलं. त्यांच्या याच कृतीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
व्हिडीओ
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची परळी विधानसभा मतदारसंघातली लढत लक्षवेधी ठरली होती. कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदारांनी कौल दिला तो धनंजय मुंडे यांनाच. हा निकाल भाजपासाठी धक्कादायक होता. मात्र शरद पवार यांनी हा निकाल मुळीच धक्कादायक नव्हता असं म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी हा पराभव स्वीकारला आहे. लोकांनी दिलेला कौल आपल्याला मान्य आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी परिवर्तन घडवण्यासाठी, बदल घडवण्यासाठी मतदान करा असं आवाहन केलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या भाषणाची एक क्लीप व्हायरल झाली होती. या क्लीपमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुनही राजकारण रंगलं. धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसात तक्रारही करण्यात आली. मात्र मी पंकजा मुंडेंना उद्देशून काहीही बोललोच नाही असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं. त्यावेळी त्यांना अश्रूही अनावर झाले होते. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या कथित भाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. तसंच त्यांना भोवळही आली होती. या सगळ्या अश्रूंच्या राजकारणाचा फायदा कुणाला होणार याची चर्चा परळीत रंगली होती. परळीतून धनंजय मुंडे निवडून आले. त्यावेळी जेव्हा काही कार्यकर्ते पंकजा मुंडेंविरोधात घोषणाबाजी करु लागले तेव्हा त्यांना धनंजय मुंडेंनी अडवलं आणि अशा प्रकारे मुळीच घोषणा द्यायच्या नाहीत असा इशारा दिला.