चिंतनगटात विदर्भातील एकाही शिक्षकाचा समावेश नाही

शिक्षण विभागाकडून विदर्भावर अन्याय

प्रतिनिधिक छायाचित्र

शिक्षण विभागाकडून विदर्भावर अन्याय

रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

चंद्रपूर : राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध क्षेत्रातील विद्वानांच्या ज्ञानाचा उपयोग होण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेत चिंतनगटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटात विदर्भातील एकाही शिक्षकाचा समावेश नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही संकल्पना मूळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहे.

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी नुकतीच चिंतनगटाची स्थापना केली. यात मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, निवृत्त शिक्षण संचालक, निवृत्त प्राध्यापक, निवृत्त शिक्षण सहसंचालक, उपविभाागीय संचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सदस्य, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,  निवृत्त उपशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक, तंत्रस्नेही, तथा स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अशा एकूण ३२ सदस्यांचा समावेश करण्यात आला. हे करताना प्रत्येक विभागाला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र विदर्भाचा यात समावेश नाही. पश्चिम विदर्भातील दोन अधिकाऱ्यांना या समितीत स्थान दिले आहे. पण उर्वरित विदर्भातील एकही शिक्षक यात नाही. विदर्भातील शिक्षकांनी चिंतनगटाच्या माध्यमातून अनेक चांगले प्रयोग केले आहेत.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेत सर्वप्रथम चिंतनगट स्थापन केला होता. त्याच्या कामाला सुरुवातही झाली होती. मात्र राज्यस्तरावर शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी जेव्हा चिंतनगट स्थापन केला तेव्हा चंद्रपूरच्या चिंतनगटातील शिक्षकांची साधी मदतही घेतली नाही. एकूणच विदर्भातील शिक्षकांना या चिंतनगटातून डावलण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गटाची घाईत स्थापना करून त्याची पहिली बैठक आटोपण्यात आली. त्या बैठकांपासूनही विदर्भातील शिक्षकांना वंचित ठेवण्यात आले.

या गटात विदर्भातील एकही शिक्षक प्रतिनिधी नाही याचा खेद वाटतो. विदर्भ विशेषत: चंद्रपूर जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवले आहेत. चिंतनगट संकल्पना ही मुळात चंद्रपूर जिल्ह्याची आहे. त्यामुळे येथील एका सदस्याला राज्यस्तर चिंतनगटात संधी मिळायला हवी होती.

– हरीश ससनकर, जनसंपर्क अधिकारी, चिंतनगट, जिल्हा परिषद चंद्रपूर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: No teacher of vidarbha included in think tank group zws

ताज्या बातम्या