महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक क्रांती होण्यासाठी संगीत कलेचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्रात संगीत, साहित्य, नाटय़ क्षेत्रात जातीपाती-धर्म असा भेदभाव नाही. एवढी समृद्ध संपन्न परंपरा असूनही राजकारणात ती का दिसत नाही, असा सवाल ‘लोकसत्ता’ चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी केला.
सोलापुरात श्री सिद्धेश्वर सहकारी बँक सेवक सांस्कृतिक मंडळाने आयोजिलेल्या शारदोत्सव व्याख्यानमालेत संगोराम यांचे ‘महाराष्ट्राचे बदलते सांस्कृतिक जीवन’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किलरेस्कर सभागृहात झालेल्या या व्याख्यानास श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. बँकेचे अध्यक्ष सुभाष मुनाळे यांनी संगोराम यांचे स्वागत केले. यावेळी बँकेचे संचालक नरेंद्र गंभीरे, राम शर्मा आदी उपस्थित होते.
विस्तृतपणे विषयाची मांडणी करताना संगोराम यांनी बाराव्या शतकापासूनच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचा आढावा घेतला. संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई ही पहिली महिला संत ठरली. त्यातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला गेला. त्याच काळात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्रांती होत गेली. ज्ञानेश्वरांना ब्राह्मणांनीच त्रास दिला. संत तुकारामांएवढा विद्वान संत देशात झाला नाही. माणूसपणाविषयीचे त्यांचे भाष्य महत्त्वाचे असून त्याचे परिणाम आजच्याही सामाजिक जीवनात दिसतात. संतांच्या वैचारिक क्रांतीतून महाराष्ट्राला विचार करण्याची शक्ती मिळाली. याच वैचारिक परंपरेचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांपासून दिसून येतो.
हजारो वर्षांपासून मौखिक गायनाचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात अभिजात संगीताची परंपरा लोकसंगीतातून बाहेर पडत पुढे आली. कीर्तनाच्या परंपरेतून लावणी आली. लावणीने मोठे सांस्कृतिक व सामाजिक योगदान दिल्याचे नमूद करीत संगोराम म्हणाले, महात्मा फुले हे स्वत: श्रीमंत बागायदार असूनदेखील त्यांनी दलितांसाठी स्वत:ची विहीर खुली केली. मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. विचारांची लढाई विचारांनीच लढली. यामागे छत्रपती शिवरायांचे वैचारिक अधिष्ठान होते. महाराष्ट्रात मुस्लिमांची संगीत परंपरा येऊन सांस्कृतिक संकर झाला. महाराष्ट्राने जगाला शब्द संगीत दिले. त्यातून भावगीतांची समृद्ध परंपरा निर्माण केली. संगीतातून भावना पोहोचविण्याची ताकद महाराष्ट्र संगीतात आहे. छत्रपतींनी जगण्यातले गाणे शिकविले. म्हणूनच शेजारच्या कर्नाटक संगीतापेक्षा उत्तर हिंदुस्थानी संगीत स्वीकारले गेले. दिगंबर बुवा पलूसकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानात गांधर्व महाविद्यालय उभारले. त्यातून कानसेनही निर्माण झाले. अशा सांस्कृतिक व सामाजिक वारशाचा धांडोळा संगोराम यांनी घेतला. ही समृद्ध परंपरा राजकारणात पुढे का गेली नाही? लोकमान्य टिळकांचे कर्तृत्व आपण नंतर विसरलो आणि निवडणुकीत जातींचा विचार करीत बसलो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.