दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्यातील युती सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी कॉंग्रेसने सोमवारी नागपूरमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मोर्चाचा फज्जा उडाला आणि कार्यकर्त्यांअभावी नेत्यांवरच घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्याची वेळ आली.
राज्यात ८० टक्के गावांमध्ये दुष्काळ असून, तेथील शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेसने शेतकऱ्यांचा मोर्चा आयोजित केला होता. मात्र, या मोर्चासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत शेतकरी आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते नागपूरमध्ये जमलेच नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाच इतर नेत्यांसह घोषणाबाजी करीत विधानभवनापर्यंत जावे लागले. नेत्यांची घोषणाबाजी आणि कार्यकर्ते ‘गायब’ असे चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळाले.
अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी मराठवाडा आणि विदर्भातून येणार असल्यामुळे त्यांना यायला उशीर लागणार असल्याचे सांगत माजी मंत्री नितीन राऊत यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दुष्काळ अतिशय भीषण असून राज्यातील सुमारे ८० टक्के गावांमध्ये शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.