भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व त्यांच्या कुटुंबियांनी गोदा पूजनाचा निर्णय ऐनवेळी घेतला होता. त्यामुळे त्यांच्या मार्जन स्नानासाठी बुधवारी गंगापूर धरणातून ५० दशलक्ष घनफूट पाणी सोडले असे म्हणणे अयोग्य असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
आखाडय़ांच्या ध्वजारोहणाची वेळ आणि एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी पाणी सोडण्याची वेळ हा केवळ योगायोग होता. नागपंचमी आणि आखाडय़ांचे ध्वजारोहण असल्याने आणि मोठय़ा संख्येने भाविक स्नानासाठी येणार असल्याने पाणी सोडणे आवश्यक होते. तसेच एकलहरे औष्णिक वीज केंद्राने ५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे मंगळवारी सकाळी धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात झाल्याचे महाजन यांनी नमूद केले. मात्र अमित शहा यांच्या गोदापूजनाचा कार्यक्रम ऐनवेळी ठरल्याचे जलसंपदामंत्र्यांनी सांगितल्यामुळे आता, शहा यांनी जेथे स्नान केले त्या रामकुंड तीर्थावर आदल्या रात्रीच जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने तयारी का सुरू केली होती याचे गूढ निर्माण झाले आहे. तसेच मंगळवारी दुपारी पुरोहित संघाला भाजपच्या स्थानिक कार्यालयाकडून भाजप अध्यक्ष बुधवारी सकाळी रामकुंड तीर्थावर येणार असल्याचे का सांगण्यात आले, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.