अलिबाग, नागपूर, छत्रपती संभाजीनगर : देवाला नैवेद्य अर्पण करताना तो शाकाहारी असावा की मांसाहारी किंवा सण-उत्सवाच्या काळात मांसाहार करावा की नाही याबाबतचा वाद नेहमीप्रमाणे आताही रंगला आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या काळात केल्या जाणार्‍या मांसाहारी आहारावरून वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर सर्रास देवीला माशांचा नैवेद्य अर्पण केला जातो. देशातील अनेक मंदिरांमध्ये देवाला मांस, मासे यांचे नैवेद्य देतात. कोकणात गौरी पूजनाला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. तुळजापूर व नागपूरमध्येही मांसाहारी नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी कोकणामध्ये घराघरांत लगबग सुरू झाली आहे. कोकणात गणपतीबरोबरच गौरीपूजनालाही महत्त्व आहे. गौरीच्या रूपात साक्षात माता पार्वती माहेरपणाला येते, अशी मान्यता आहे. या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. मात्र कोकणात काही ठिकाणी गौरीपूजनाच्या दिवशी मटण, कोंबडीवडे असा बेत करायची पद्धत आहे. या नैवेद्यात चिंबोर्‍या म्हणजेच खेकडे व मासेसुद्धा आवर्जून समाविष्ट केले जातात. ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली, याची स्पष्टता नसली, मात्र तरीही मुरुड अलिबाग आणि उरण येथे काही ठिकाणी ती जोपासली जाते. गौरी आगमनाच्या पहिल्या दिवशी तांदळाच्या भाकरी आणि भाजीचा नैवेद्य गौराईला दाखवतात. दुसर्‍या दिवशी हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि पाच भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. याच दिवशी काही ठिकाणी लाडक्या गौरीसाठी तिखटाचा म्हणजेच मांसाहारी जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रामुख्याने कोळी समाजात ही प्रथा पाहायला मिळते. पिढ्यान्पिढ्या ही पद्धत सुरू असल्याचे सांगितले जाते.

देवाला मांसाहारी नैवेद्याची परंपरा नागपूर जिल्ह्यातही आहे. नवरात्रीमध्ये नवमीच्या दिवशी कुंभार समाजातील काही कुटुंबाद्वारे आजही दुर्गा देवीला मांसाहाराचा नैवेद्य करतात. यात कुटुंबीयांसह त्यांचा मित्र परिवारही उपस्थित असतो. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात कुवारा भीमसेन देवस्थान येथे दरवर्षी चैत्रातील पंचमीला भरणार्‍या गोंड आदिवासी समाजाच्या जत्रेत पारंपरिक पद्धतीने बकरा किंवा कोंबडीचा बळी देण्याची प्रथा पाळली जाते. नागपुरात रामनगर, काँग्रेसनगर, मोतीबाग भागात काली मातेची मंदिरे आहेत. येथे नवरात्रचा अपवाद वगळला तर नवस पूर्ण झाल्यानंतर मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. नागपुरात अनेक कुटुंबांमध्ये परंपरेनुसार कुलदेवी किंवा कुलदैवताला मांसाहारी नैवेद्य दाखवल्याशिवाय नवस पूर्ण झाल्याचे समजत नाही. चंद्रपूर येथील भाविक आजही आपल्या घरी श्री महाकाली देवीच्या नावाने नवस फेडण्यासाठी मांसाहाराचा नैवेद्य तयार करतात. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मरीमाता, अंबेमाता या ग्रामदेवींना नवसाच्या वेळी मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो.

तुळजापुरात अजाबळी

तुळजापूरच्या मंदिरात नवरात्रीमध्ये नवमी दिवशी अजाबळी होतो. होमामध्ये मेंढ्याचा बळी दिला जातो. हा नैवेद्यच. तो महिषासुराला दिल्याचे मानले जाते. तसेच काळभैरवाच्या मंदिरात मांसाहारी नैवेद्य, त्याबरोबर गांजा आणि मद्य याचीही व्यवस्था केली जाते. दिवाळीमध्ये भेंडोळीच्या दिवशी तसेच अमावास्येला काळभैरवाला हे नैवेद्य दिले जातात. सीमोल्लंघनाच्या वेळी तुळजाभवानीची मूर्ती उचलताना मेंढ्याचे बळी दिले जातात. कापलेल्या बळीचे रक्त आशीर्वाद म्हणून लावणारेही अनेक भाविक आहेत. तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील मंदिरातही बळी प्रथा आहे. तो नैवेद्य म्हणून भाविक ग्रहण करतात.

धार्मिक उत्सवातील मांसाहारावरून वाद

पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेदरम्यान मांसाहार करू नका, असे आवाहन बागेश्वर मठाचे प्रमुख धिरेंद्र शास्त्री यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला. तृणमूल काँग्रेसने भाजपवर उत्तर भारतीय संस्कृती बंगालवर लादण्याचा आरोप केला. त्यानंतर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी कालीघाट मंदिरात जाऊन माशांचा महाप्रसाद सेवन केला. माँ कालीला अर्पण केलेला माशाचा भोग हा आमचा पारंपरिक प्रसाद असल्याचे त्यांनी सांगितले.

मीरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या मालकीच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पर्युषण काळात डब्यामध्ये मांसाहारी पदार्थ तसेच कांदा, लसूण, बटाटा यांसारखे कंदमूळ पदार्थ न आणण्याचे आवाहन केले. त्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला.

कोकणात गौरी पूजनाला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. राज्यांतील अनेक लोकदेवतांच्या मंदिरांमध्ये मांसाहारी नैवेद्य देण्याची परंपरा आहे.