सांगली : म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू हा सामूहिक आत्महत्या नसून, गुप्तधनाच्या लालसेतून झालेले हत्याकांड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सोलापूरमधील दोन भोंदूना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सोमवारी ही माहिती दिली.

 म्हैसाळ (ता. मिरज) येथे २० जून रोजी उघडकीस आलेल्या नऊ जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करीत असताना हा प्रकार सामूहिक आत्महत्येचा नसून, सदोष मनुष्यवधाचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी आब्बास महमंदअली बागवान (४८ रा. सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवसे (३० रा. सोलापूर) या दोघांना सोमवारी अटक करण्यात आली. या दोघांनी या सर्वाना विषारी औषध दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.

या दोघे संशयित आणि वनमोरे बंधू यांच्या वारंवार भेटी होत होत्या. गुप्तधनासाठी या भेटी होत होत्या़  यातून पैशाचे देणेघेणे झाले असावे, दोघेही घटनेच्या आदल्या रात्री म्हणजे १९ जून रोजी म्हैसाळ येथे येऊन गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचेही गेडाम यांनी सांगितले. एकाच कुटुंबातील नऊ जणांचा संशयास्पद मृत्यू दोन स्वतंत्र ठिकाणी झाल्याची घटना उघडकीस आली होती. डॉ. माणिक वनमोरे, रेखा वनमोरे, आक्काताई वनमोरे, प्रतिमा वनमोरे, आदीनाथ वनमोरे, शुभम वनमोरे या सहा जणांचे मृतदेह एका घरात, तर दीड किलोमीटर अंतरावरील घरात पोपट वनमोरे, संगीता वनमोरे, अर्चना वनमोरे या तिघांचे मृतदेह आढळले होते.