खंडीत वीजपुरवठय़ाचा शहराच्या पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम होत असून वीज पुरवठय़ातील अडथळे तातडीने दूर करण्याचे महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दत्तात्रेय कोळी यांनी मान्य केले. तशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
खंडीत विजपुरवठय़ामुळे गेल्या महिना, दीड महिन्यापासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासंदर्भात महपौर संग्राम जगताप यांनी नुकरतीच कोळी यांची भेट घेऊन तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कोळी व जगताप यांनी गुरूवारी संयुक्तरित्या या व्यवस्थेची पाहणी केली. महाविकरणचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी, गोरे यांच्यासह नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अजिंक्य बोरकर, आरीफ शेख, मनपाचे अभियंता महादेव काकडे, विलास सोनटक्के व पाणीपुरवठा यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या संयुक्त पाहणीत या व्यवस्थेवरील अनेक अडथळे पुढे आले. मध्यंतरीच्या वादळ-वाऱ्यामुळे नागापूर एमआयडीसीजवळील वीज वाहिन्यांमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. झाडांच्या फांद्या या तारांवर आल्या असून त्यामुळे पाणीयोजनेच्या वीजपुरवठय़ात सातत्याने अडथळा येतो, त्याचा विपरीत परिणाम शहराच्या पाणीपुरवठय़ावर झाला आहे. रामदास इस्पात कंपनीजवळ वीज वाहिनीला मोठा झोळ पडल्याचेही यावेळी कोळी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या सर्व गोष्टींची तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना कोळी यांनी यावेळी संबंधीतांना दिल्या. तसेच मुळा धरणपासुन ३० किलोमीटर अंतरावरील या वीज वाहिनीला प्रत्येकी १० किलोमीटर अंतरावर ब्रेकर बसवण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यामुळे वीज पुरवठा कुठे खंडीत झाला याची निश्चित माहिती लगेच मिळू शकेल असे त्यांनी सांगितले. पावसाळ्याच्या दिवस लक्षात घेऊन या गोष्टींची तातडीने पुर्तता करून शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय येणार नाही याची काळजी घेण्याची विनंती जगताप यांनी यावेळी केली.