सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेसाठी यात्रा आराखडय़ानुसार सूचनांचे पालन न केल्याने जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी सिध्देश्वर मंदिर समितीला नोटीस बजावली आहे. जिल्हाधिका-यांची ही वक्रदृष्टी दूर व्हावी आणि आपल्या ‘व्यावसायिक वृत्ती’ला बाधा न येण्यासाठी मंदिर समितीने सोलापूरचे पालकमंत्री तथा सिध्देश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी विजय देशमुख यांचा धावा केला आहे. या दबावतंत्राला जिल्हाधिकारी मुंडे हे बळी पडणार नाहीत, असे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, येत्या १३ जानेवारीपासून सिध्देश्वर यात्रेला प्रारंभ होणार आहे. १७ जानेवारीपर्यंत चालणा-या या यात्रेत लाखो भाविकांचा सहभाग अपेक्षित आहे. १३ जानेवारी रोजी ६८ लिंगांना तैलाभिषेक करून यात्रेला प्रारंभ होणार आहे. दि. १४ रोजी दुपारी एक वाजता सिध्देश्वर मंदिर परिसरात संमती कट्टय़ावर अक्षता सोहळा होणार आहे. तर दि. १५ रोजी रात्री होम मैदानावरील होम कट्टय़ावर होम प्रदीपन सोहळा होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी रात्री होम मैदानावर शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण होणार आहे. दि. १७ रोजी वस्त्रविसर्जन विधी झाल्यानंतर यात्रेची सांगता होईल. यात्रेनिमित्त परिसरात विविध करमणुकींसह खाद्यपदार्थ, खेळणी, शेतीविषयक प्रदर्शन आदी दालने उभारण्यात आली आहेत.
या यात्रेसाठी जिल्हाधिकारी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी सिध्देश्वर मंदिर समितीचे विश्वस्त, पोलीस, महापालिका प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांची संयुक्त बैठक बोलावली होती. यात्रेतील सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिका-यांनी यात्रा आराखडा तयार करून त्यानुसार सूचनांचे पालन करण्यास सांगितले होते. यात प्रामुख्याने धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी चटईचा (मॅट) वापर करणे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराजवळील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोरील दोन्ही प्रवेशद्वार खुले राहण्यासाठी जागा मोकळी सोडणे, भाविकांना मंदिरात टप्प्या-टप्प्याने सोडणे, भाविकांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे, मनोरे उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आदी सूचनांचे पालन करण्यास जिल्हाधिका-यांनी फर्मावले होते. परंतु यात मंदिर समितीने जबाबदारी झटकत आपल्या ‘व्यावसायिक वृत्ती’ कायम ठेवल्याचे दिसून आले. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी मुंडे यांनी मंदिर समितीला खडे बोल सुनावत नोटीस बजावली आहे. मंदिर समितीने सूचनांचे पालन करणे जमत नसल्यास यात्रा बंद करावी, अशा शब्दात जिल्हाधिका-यांनी कान उघाडणी केली आहे.
मंदिर समितीच्या धोरणाविषयी नागरिकांच्याही बऱ्याच तक्रारी आहेत. विशेषत: मंदिर समितीचा कारभार पारदर्शक राहत नाही. यात्रेच्या काळातील आर्थिक हिशेब खुला केला जात नाही. त्याकडे लक्ष वेधूनसुध्दा स्पष्टीकरण दिले जात नाही. उलट, विकास कामांसह स्थानिक सुधारणांसाठी महापालिका व शासनाकडे बोट दाखविले जाते, असा अनुभव आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी मुंडे यांनी यात्रेच्या काळात सुधारणा होण्याच्या दृष्टीने पंचकट्टा ते राणी लक्ष्मी भाजी मंडई, तसेच विजापूर वेस परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढून दिलासा दिला असताना दुसरीकडे मंदिर समितीला सूचनांचे पालन न केल्याबद्दल नोटीस बजावल्याने नागरिकात हा कौतुकाचा विषय बनला आहे. तर, मंदिर समितीने कारवाईला सामोरे जाण्याचे टाळण्यासाठी पालकमंत्री विजय देशमुख यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.