विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्यात जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मनोमिलन झाले आहे. ससाणे यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरची युती तोडली असून, बँकेच्या निवडणुकीत ते विखे गटाबरोबर राहणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघात तालुक्यात ससाणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनाथ थोरात यांच्यात सरळ लढत होणार आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे व विखे गटात छुपी सहमती होती. ससाणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी विरोध केल्यानंतर त्यांची साथ सोडली. विखे यांनी ससाणे यांना शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष होऊ दिले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते विखे व ससाणे यांच्यात राजकीय दरी तयार झाली होती. माजी खासदार विखे व मुरकुटे यांच्यात छुपी युती झाली. मात्र आता जिल्हा बँक निवडणुकीत पुन्हा एकदा विखे व ससाणे एकत्र आले आहेत. ससाणे यांनी काँग्रेस पक्षांतर्गत राजकारणात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बँक निवडणुकीत मुरकुटे यांना थोरात यांच्याशी युती करावी लागणार आहे.
माजी खासदार विखे यांनी अशोक कारखाना निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव भाऊसाहेब कडू यांच्यामार्फत दिला होता. निवडणूक बिनविरोध झाल्यास जिल्हा बँक प्रतिनिधीची जागा व बाजार समिती विखे ससाणे गटाला देण्याचा प्रस्तावात उल्लेख होता. मात्र हा प्रस्ताव धुडकावण्यात आला. निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन मंडळ तयार झाल्याने निर्णय घेता येत नसल्याचे ससाणे यांनी सुचविले. मुरकुटे यांनी जिल्हा बँक निवडणुकीत रामभाऊ लिप्टे यांना उमेदवारी दिली तर निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव दिला होता. लिप्टे यांनी सेवासंस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. ससाणे यांनी अशोकची निवडणूक सुरू असताना अशा प्रकारच्या प्रस्तावाची चर्चा सुरू असून त्याचा परिणाम होईल अशी भूमिका घेतली होती. राधाकृष्ण विखे यांनी जिल्हा बँक निवडणुकीची सूत्रे डॉ. सुजय विखे यांच्याकडे सोपवली आहेत. त्यांनीच ससाणे यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर लिप्टे यांना माघार घेण्याचा आदेश दिला.