लोकशाहीत सत्तापरिवर्तन हा अटळ आहे. मतदारांना निश्चित हा अधिकार आहे, मात्र राज्य व केंद्रात झालेल्या ताज्या सत्ताबदलानंतर जनतेत आता मात्र नाराजीचा सूर आहे. ‘ती आमची चूक झाली’ हेच जनतेला यातून सांगायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ अध्यक्ष शरद पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. शेतीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्न अल्पावधीत जटिल झाले असून, राज्य व केंद्र सरकारने यात अधिक लक्ष घातले पाहिजे, असे ते म्हणाले.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांच्या अंत्यविधीला श्रीरामपूर येथे हजेरी लावून पुण्याला परतताना पवार काही वेळ नगर येथे थांबले होते. या वेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आमदार दिलीप वळसे, महापौर तथा आमदार संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप, आमदार अरुण जगताप, दादा कळमकर आदी या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, राज्यात जनतेने या वेळी दोन्ही काँग्रेसला बाजूला केले. मात्र भाजपला ज्या भागात चांगली मते मिळाली तेथेच त्यांच्याविषयी नाराजी दिसू लागली आहे. ‘आमची चूक झाली’ असे फलकच राज्याच्या काही भागात लागू लागले आहे. दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणीलाही नव्या पिढीत चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यातून संघटनेची चांगली बांधणी होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
कांदा, डाळिंबाचे भाव कोसळले, उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे, भाव कोसळल्याने दूध उत्पादक अडचणीत सापडला आहे. राज्य व केंद्रातील सत्ताबदलानंतर हे प्रश्न एकदम उफाळून आले हे लक्षात घेतले पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले, उसाला एफआरपीनुसार तेही १४ दिवसांत पैसे दिले पाहिजे, हे आम्हालाही मान्यच आहे. शेतकऱ्याच्या हातात पुरेसे पैसे पडले पाहिजे. मात्र यातील अडचणी सत्ताधाऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यातून सकारात्मक दृष्टीने मार्ग काढला पाहिजे. उसाचे पैसे १४ दिवसांत द्यायचे तर साखर कारखान्यांची वीज, इथेनॉलचे पैसे सरकार किंवा सरकारी कंपन्यांकडूनही कारखान्यांना पैसे वेळेवर मिळाले पाहिजे. एकीकडे त्याला विलंब होतो, मग शेतकऱ्यांना १४ दिवसांत पैसे कसे देणार, असा सवाल पवार यांनी केला. यात राज्य केंद्र सरकारनेच व्यवहार्य मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी साखर निर्यातीला पूर्ववत ३ हजार ३१० रुपये अनुदान तातडीने सुरू करावे, अशी मागणी पवार यांनी केली. या सगळय़ा गोष्टींचा एकत्रित विचार सरकारने केला पाहिजे.
पवार म्हणाले, मागच्या काळात राज्यातील काही साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक भाव दिला होता, मात्र त्याच्यावरही आयकर विभागाची कारवाई सुरू असून त्यातुनही मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. ते म्हणाले, हे सगळे प्रश्न रात्रीत संपणार नाही, याची आम्हालाही जाणीव आहे. मात्र सरकारने यातून सकारात्मक दृष्टिकोनातून मार्ग काढला पाहिजे, तसे होताना दिसत नाही.
विखेंनी घेतली सदिच्छा भेट
एका हॉटेलवर पवार यांची पत्रकार परिषद झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी येथे येऊन पवार यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. दोघांमध्ये काही वेळ येथे चर्चा झाली. मात्र ही सदिच्छ भेट होती, असे सांगण्यात आले.