भाजपाचे मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीचं सरकार पडणार असल्याचे अनेकदा सांगत होते. त्यांच्यासोबत भाजपाच्या नारायण राणेंसह अन्य काही नेत्यांकडूनही अशाप्रकारची विधानं केली जात होती. सरकार पडण्याच्या विविध तारखा सांगितल्या जात होत्या. अखेर शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार बाहेर पडले. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मात्र यामागे भाजपाचं नियोजन होतं, असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे केलेल्या विधानावरून दिसून आलं आहे. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये चंद्रकांत पाटील भाषण करताना, “मी काही वेडा नव्हतो म्हणायला काही ना काही संदर्भ, घटना माझ्या मनामध्ये होत्या. काही ना काहीन नियोजन माझ्या मनात होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता, की आपलं सरकार येतंय काळजी करू नका. त्यांचं मनोबल टिकवायचं होतं. त्यामुळे म्हणावं लागायचं की येणार आहे सरकार, नियोजन सुरू आहे. पण खरंच नियोजन सुरू होतं. ४० जणांना बाहेर काढणं हे सोपं नव्हतं. त्यासाठी वेळ लागत होता. तो वेळ लागत असताना, सगळ्यांना धरून ठेवण्याची पण आवश्यकता होती. शेवटी त्याची जी वेळ होती ती साधली गेली आणि सरकार आलं.” असं म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या या भाषणावरून नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील आमदारांवर टीका केली आहे. “मविआ सरकार पाडण्यासाठी केलेल्या कटकारस्थानाची ही कबुली. इतरांचे सरकार पाडण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते हे सिद्ध झालं. आता तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ‘हिंदुत्वासाठी गेलो’ अशा थापा मारण बंद करावं.” असं नाना पटोले यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

याशिवाय “राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थाने करुन पाडून शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले. या १०० दिवसांत ईडी सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्वीकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत. राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख थेट रोजगार निर्मितीचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घातला, इतर गुंतवणूकही घालवली. गुजरातचे हित जोपसणे व महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता हेच ईडी सरकारने १०० दिवसांत केलं आहे.” अशी टीकाही नाना पटोलेंनी केली आहे.