वाशीम जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची आता करोना चाचणी

जिल्ह्यात काही सवलतींसह २७ मेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत

(संग्रहित छायाचित्र)

अकोला : वाशीम जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जिल्ह्याच्या सीमेवरच करोना चाचणी करण्यात येणार आहे. ई-पास शिवाय कोणालाही जिल्ह्यात येण्याची अथवा जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे या आढावा बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्ह्यात काही सवलतींसह २७ मेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. या दरम्यान सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत काही दुकाने, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या कालावधीत शहरी व ग्रामीण भागात लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांनी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात राहून आवश्यक कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच परवानगी नसलेली दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

स्वस्त धान्य दुकाने, बँक, कृषी सेवा केंद्र व अवजारांची दुकाने याठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी. बँक खातेधारकांनाही टपाल विभाग व बँक व्यवसाय प्रतिनिधींद्वारे खात्यातील रक्कम घरपोच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने तालुकास्तरावर अंमलबजावणी होण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तालुक्यातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच नियमित लसीकरण, पोषण आहार वितरण यामध्ये कोणत्याही परिस्थितीत खंड पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथींच्या आजारावर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषधसाठा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे म्हणाले, ज्या बँकांमध्ये गर्दी होत आहे, तेथे टोकन पद्धत सुरू करण्याबाबत नियोजन करावे. तसेच नियमांचे सतत उल्लंघन करणाऱ्या आस्थापनाधारक, दुकानदारावर गुन्हे दाखल करून आस्थापना करोना ही राष्ट्रीय आपत्ती घोषित असेपर्यंत सील करावी. जिल्ह्यात गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Now everyone who coming to washim district has to do corona test zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या