करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील यंदाची दर्शन सुरक्षा, प्रसाद याची व्यवस्था उत्तम प्रकारची आहे. अंबेमातेच्या दर्शनासाठी होणारा गोंधळ यंदा खूपच कमी झाला आहे. सीसीटीव्ही, श्वानपथक, मोबाईल जामर यांसारखी आधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्याने सुरक्षा यंत्रणेवरील ताणही काहीसा कमी झाला आहे. मुख दर्शनाची सोय झाल्याने मुख्य रांगेतील गर्दीही कमी झाली आहे. व्हीआयपी पास बंद झाले असले तरी अन्य नावांवर त्यांची घुसखोरी सुरू राहिल्याने भाविकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
साडेतीन शक्तिपीठापकी मंदिर म्हणून महालक्ष्मीची सर्वदूर ओळख आहे. शारदीय नवरात्र उत्सवात अंबामातेचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविकांची गर्दी उसळलेली असते. या नऊ दिवसांमध्ये सुमारे ८ ते १० लाख भाविक करवीर नगरीत दाखल झालेले असतात. भाविकांच्या या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल सज्ज झाले आहे. त्याच्या जोडीला मंदिरातील सुरक्षा यंत्रणा उभी राहिली आहे. शनिवार, रविवार व सोमवार या पहिल्या तिन्ही दिवशी अडीच लाखावर भाविकांनी मंदिरात उपस्थिती लावली तरी त्याचा सुरक्षा यंत्रणेवर फारसा ताण पडला नसल्याचे दिसून आले. शिवाय दर्शन रांग सुनियोजित केल्यामुळे गर्दी, गोंधळ, ढकलाढकली यासारखे प्रकार घडले नाहीत.
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मुख्य रांग व मुखदर्शन रांग अशा दोन रांगा केल्या आहेत. गरुड मंडपासमोरील पडदा यावर्षी काढून टाकला आहे. या मार्गाने दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. मुख्य रांगेतून दर्शन घेण्यासाठी अवधी लागत असल्याने घाईगडबडीत असलेल्या भाविकांना या रांगेचा आधार वाटत आहे. मुख्य रांगेचा मार्गही मंदिरात वेगवेगळ्या वळणांनी बनविण्यात आला आहे. त्यामध्ये असलेल्या भाविकांना शिस्तबध्दरीत्या पुढे जाणे शक्य झाले असल्याने अनुचित प्रकार घडताना दिसत नाहीत. दरवर्षी व्हीआयपी पासवरून भाविक व व्यवस्थापन यांच्यात खडाजंगी उडत असते. यावर्षी व्हीआयपी पासवर फुली मारण्यात आली आहे. तथापि देवस्थान समितीशी संबंधितांचे सगेसोयरे इतर नावावर मंदिरात घुसखोरी करीत आहेत. अशावेळी भाविकांकडून तिखट मारा केला जात असल्याने काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
यावर्षी मंदिर परिसर नो व्हेईकल करण्यात आला आहे. महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, भवानी मंडप, जोतिबा मंदिर अशा सर्व बाजूंना असणारी वाहने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनांचा कर्कश आवाजही थांबला आहे. या बदलाच्या स्वागतार्ह प्रतिक्रिया भाविकांतून उमटत आहेत. मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकांची तपासणी मेटल डिटेक्टरद्वारा केली जात आहे. १८ ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे मंदिरातील सर्व घटनांवर नजर ठेवून आहेत. पुणे येथील रक्षक ग्रुपचे समरदेव हे राजा-राणी या दोन मेघालयातून आणलेल्या डॉबरमॅन श्वान पथकाकरवी मंदिरात दिवसातून दोनदा फेरी मारत आहेत. एकूणच यंदाची सुरक्षा व्यवस्थाही भक्कम असल्याचे चित्र दिसत आहे.