भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचा ‘इनोव्हा पार्टी’ असा उल्लेख केला. गेल्या वेळी त्यांचे ८ खासदार निवडून आले. एकाच इनोव्हा मोटारीत ते मावतात. येत्या लोकसभा निवडणुकीत ती ‘नॅनो पार्टी’ होईल. आता त्यांचे चारच खासदार निवडून येतील, ते एकाच नॅनो मोटारीत बसतील असे फडणवीस म्हणाले.
नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांनी मंगळवारी मिरवणुकीने जाऊन शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी फडणवीस यांच्यासह विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार राम शिंदे, शिवाजी कर्डिले, विजय औटी व अनिल राठोड त्यांच्या समवेत होते. अर्ज दाखल केल्यानंतर मार्केट यार्डात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसवर जोरदार टीका केली. वरील नेत्यांसह माजी खासदार जयसिंग गायकवाड व महायुतीचे अन्य नेते उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खोटं बोलण्याबाबत ख्याती असली तरी कधीतरी ते खरंही बोलतात. ‘एका ठिकाणी मतदान झालं, की हाताची शाई पुसून दुस-यांदा मतदान करा’ असे त्यांनी नुकतेच जाहीरपणे सांगितले. हे त्यांचे खरेच बोल आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादीचा खरा चेहरा जगापुढे आला आहे. राज्यातील आर्थिक घोटाळय़ांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे. राज्य सरकारकडे शेतक-यांसाठी पैसे नाहीत, भ्रष्टाचारासाठी मात्र राज्याची तिजोरी पूर्ण खुली आहे. या सरकारने शेतक-यांना केवळ भूलथापांमध्येच फसवल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. जलसिंचन, टोलवसुली हे त्याचेच द्योतक आहे असे ते म्हणाले.
एकीकडे राज्यात राष्ट्रवादीची ही स्थिती असताना केंद्रात काँग्रेसची वेगळीच अधोगती आहे. पंतप्रधान मनमोहन हलत नाही की बोलत नाहीत, सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्ष असल्या तरी पंतप्रधान म्हणनच त्या वावरतात. हे पद त्याच चालवतात आणि राहुल गांधींना अजूनही देश, देशातील सर्वसामान्यांचे प्रश्नच समजले नाहीत. मनमोहन सिंग यांच्या दुबळय़ा नेतृत्वाखालील केंद्र सरकार यापुढे देशाला कणखर नेतृत्व देऊ शकणार नाही, ही ताकदच त्यांच्यात राहिलेली नाही. त्यांच्यापासून देश वाचवण्यासाठी आता नरेंद्र मोदी आणि भाजपशिवाय पर्याय नाही असे सांगून येत्या निवडणुकीत दिलीप गांधी या वेळी दुप्पट मतांनी निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
तावडे यांनीही या वेळीदोन्ही काँग्रेस आणि राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मनमोहन सिंग हा केवळ पुतळा आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशात केवळ भ्रष्टाचारच झाला. राज्य सरकारही केवळ घोषणाबाजी करीत असून मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजीमहाराजांचे अरबी समुद्रातील नियोजित स्मारक या घोषणाही हवेतच विरल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर आम्हीच या गोष्टी पूर्ण करू. त्यासाठी आधी देशात मोदींना पंतप्रधान करणे गरजेचे आहे आहे. विरोधकांनी दिलीप गांधी यांच्या अनुषंगाने अर्बन बँकेबाबत खोटा प्रचार सुरू केला असून, बँकेत कोणताही घोटाळा नाही असा निर्वाळा देताना त्याची खातरजमा करूनच गांधी यांना उमेदवारी दिल्याचे तावडे यांनी सांगितले.
गांधी-राठोड मनोमिलन
गांधी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार राठोड तब्बल महिनाभराने मंगळवारी त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले. या वेळी त्यांनी आपल्याबद्दल सर्वानाच उत्सुकता होती, मात्र गेल्या २५ वर्षांत आपण भगवा कधी खाली ठेवला नाही. आताही या निवडणुकीत गांधी यांना सर्वाधिक मताधिक्य नगर शहरातून मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.