मालेगावमध्ये म्हणजेच दादा भुसेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका केली. तसंच आता आपलं एकच लक्ष्य आहे जिंकेपर्यंत लढायचं! असा नवा नारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.मालेगावच्या एमएसजी (मसगा) कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. तेव्हा बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “राहुल गांधींनी प्रश्न विचारला २० हजार कोटी रूपये कोणाचे? त्यावरती भाजपाकडे उत्तर नाही आहे. हिंडेनबर्ग हजारो कोटी रूपयांचे घोटाळे काढत आहे. पण, भाजपा त्याला किंमतही देत नाही. पंतप्रधान उत्तरही देत नाही. आमच्याकडे साध्या-साध्या लोकांच्या पाठीमागे ईडी, सीबीआय लावून घोटाळे काढण्यात येत आहेत.”
काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?
आजच्या सभेचं काय वर्णन करायचं? १५ दिवसांपूर्वी खेडला जी सभा होती तिथे अभूतपूर्व गर्दी होती. आज अथांग गर्दी पसरली आहे. आज आपलं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं तरीही एवढी गर्दी आहे. ही आमच्या पूर्वजांची पुण्याई आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे. मी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. तर तुमच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. आता जिंकेपर्यंत लढायचं आहे. सुरूवातीलाच विचारतो, जिंकेपर्यंत साथ देणार ना? असं विचारलं असता सगळ्यांनी हो म्हटलं आहे.
मालेगावकरांचे मानले आभार
मी मुख्यमंत्री असताना करोनाची साथ आली होती. त्यावेळी मालेगाव आणि धारावी अशा दोन ठिकाणची काळजी होती. मी त्यावेळी घरात बसून मालेगावकरांना आवाहन केलं होतं त्यावेळी मालेगावकरांनी ऐकलं होतं. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असंही उद्धव ठाकरे म्हटलं आहे.
भाजपाला खुलं आव्हान
तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातल्या भाजपाला विचारतो आहे. तुम्ही म्हणजे भाजपा मिंध्यांच्या नेतृत्त्वात निवडणुका लढणार आहात का? ते जाहीर करा. होय आम्ही मिंधेंना नेता मानून निवडणुका लढणार हे भाजपाने जाहीर करावं. आज भाजपाला मी आव्हान देतो आहे की जर त्यांना हे वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली तरीही ठाकरेंपासून शिवसेना तुम्ही तोडू शकत नाही. हिंमत असेल तर प्रयत्न करून बघा.” असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.