scorecardresearch

आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू, जयंत पाटलांचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उत्तर महाराष्ट्राच्या चार दिवसांच्या दौर्‍यावर असून, आज दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्हयातील पारोळा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.

jayant patil criticized shinde fadnavis government, mva vajramuth sabha
संग्रहित छायाचित्र

शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले, त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उत्तर महाराष्ट्राच्या चार दिवसांच्या दौर्‍यावर असून, आज दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्हयातील पारोळा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. सरकार आता निवडणुका होणार असल्याने बऱ्याच योजनांच्या घोषणा करेल, पण प्रत्यक्षात काम दिसणार नाही. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका. राज्यात जे वातावरण आहे ते लोकांना पटलेले नाही. लोकांना प्रलोभने दाखवली जात आहेत, पण लोक सजग झाले आहेत. त्यामुळे आपण लोकांना सक्षम पर्याय दिला पाहिजे, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रत्येक समाजघटकाचा पक्ष असून, त्या सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचणे हे आपले काम आहे. एका महिन्यात बुथ कमिट्या पूर्ण करा. आपण चांगल्या प्रकारे संघटना राबवली तर यश हे आपलेच आहे, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सामान्य जनतेच्या समस्या अजून सरकार सोडवू शकलेले नाही. या सर्व गोष्टी लोकांपर्यंत आपल्या बुथ कमिट्यांच्या माध्यमातून पोहोचवा. आपल्या बुथ कमिट्यांमध्ये महिला, पुरुष, युवक, युवती, दलित, अल्पसंख्याक या सर्व समाजघटकांना सामावून घ्या, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. मागील निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी बुथ कमिट्या पूर्ण झाल्या होत्या, तिथे आपला निकाल चांगला होता. आपण मतदारांपर्यंत पोहोचायला हवे. समोरच्या बाजूकडे शक्ती आहे, धन आहे याचा विचार करू नका. लक्षात ठेवा युक्ती ही कोणत्याही शक्तीपेक्षा श्रेष्ठ असते. युक्तीचा वापर करून जनतेला आपल्याकडे वळवा, असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.

या बैठकीला माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, जळगाव शहर जिल्हाध्यक्ष अशोक वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, युवती जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, ग्रंथालय सेल अध्यक्ष उमेश पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पराग पवार, नगरसेवक रोहन मोरे, नामदेव चौधरी, प्रवक्ता विलास पाटील, सामाजिक न्याय सेल जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, जिल्हा सरचिटणीस अमितदादा पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष बाळू पाटील, एरंडोल जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवले, संदीप पाटील, एरंडोल तालुका महिलाध्यक्षा मंजुषा पाटील, पारोळा तालुका महिलाध्यक्षा सुवर्णा पाटील, पारोळा शहराध्यक्ष कपिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष सुरेश पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 20:19 IST

संबंधित बातम्या