२४ तासात मालेगाव शहरात करोनाचे ११ रुग्ण आढळून आल्याने बाधितांची संख्या आता २८५ वर पोहचली आहे. शुक्रवारी १३ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या २० झाली आहे. करोनामुळे शहरात १३ जणांचा बळी गेला आहे.

शुक्रवारी सायंकाळी करोना चाचणीचे ५८ अहवाल प्राप्त झाले. त्यात केवळ एक जण बाधित असल्याचे आढळून आले. शनिवारी प्राप्त २३ पैकी १२ अहवाल सकारात्मक निघाले. त्यापैकी पाच अहवाल हे आधीच्या बाधित व्यक्तींच्या दुसऱ्या वेळी घेतलेल्या चाचणीचे असल्याने नव्याने सात बाधित रुग्णांची भर पडली. त्यानंतर दुपारी पुन्हा २१ अहवाल प्राप्त झाले. त्यात तीन जण बाधित असल्याचे आढळून आले. आठवडय़ात महापालिकेचे एक वैद्यकीय अधिकारी बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्याशी घनिष्ट संपर्क आलेल्या मालेगाव महापालिकेचे अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली असता आरोग्य खात्यातील एक कर्मचारी बाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कुटुंबातील तीन आणि महिला कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील दोन सदस्य बाधित असल्याचे उघड झाले. महापालिकेचे अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची चाचणी नकारात्मक आल्याने सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला. काही दिवसांपासून बंदोबस्तावरील काही पोलिसांनाही करोनाचा संसर्ग झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील पोलीस, राज्य राखीव दलाचे ४३ जण बाधित असल्याचे उघड झाले आहे. त्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह १६ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या २६ जवानांचा समावेश आहे.

टाळेबंदीचे उल्लंघन केल्यास २५ हजार रूपये दंड

करोनापासून बचावासाठी मालेगाव तालुक्यातील सौंदाणे ग्रामपंचायतीने तीन दिवसांसाठी संपूर्ण टाळेबंदी घोषित केली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. आपल्या भागात करोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील जनता सजग झाल्याचे दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने सौंदाणे ग्रामपंचायतीने एक ते तीन मे या कालावधीत गावात संपूर्ण टाळेबंदी लागू केली. या कालावधीत गावातील दवाखाने, औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश ग्रामपंचायतीने दिले आहेत. कोणालाही गावाबाहेर जाण्यास आणि बाहेरून कोणाला येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मळ्यात वास्तव्यास असलेल्या लोकांनाही गावात न येण्यास बजावण्यात आले आहे. टाळेबंदीच्या काळात कोणाला काही अत्यावश्यक गरज भासल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच डॉ. मिलिंद पवार यांनी केले आहे.