मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याकरता राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार १६ तारखेपर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. या सूचना आणि हरकतींचा विचार करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अध्यादेश जारी करण्यात येईल. यावरून राज्य सरकारने ओबीसी आणि मराठा समाजाबाबत बनवाबनवी केली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या अधिसूचनेमुळे ओबीसी की मराठा समाजाचा फायदा झालाय, हे स्पष्ट कऱण्याची विनंती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. तर, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि ओबीसी समाजाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही संताप व्यक्त केला आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटलांनी धार दिल्यानंतर ओबीसी नेत्यांनीही मनोज जरांगे पाटलांविरोधा शड्डू ठोकला होता. ओबीसी विरुद्ध मराठा समाजातील नेते आमने-सामने आले होते. यावरून दोन्ही समाजात फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असाही आरोप करण्यात आला. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीच्या राखीव कोट्यातून आरक्षण मिळेल की नाही याबाबत साशंकता होती. तसंच, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालायत न्यायप्रविष्ट असल्याने राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी सगेसोयरे, वंशावळ आदी मुद्द्यांवर केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून त्याबाबत अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी आता एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >> मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना निघाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल रात्रीपर्यंत…”
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
“ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांनी पाळलेली नाही”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. “आज मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेली अधिसूचना ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक आहे. सरकारचा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर न टिकणारे आणि निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून फसविण्यासाठी केलेली बनवाबनवी असून दुसरे काही नाही”, असंही ते म्हणाले.
“सर्व पक्षीय बैठकीत आम्हाला विश्वास देण्यात आला होता की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सरकार धक्का लावणार नाही. मात्र आजची सूचना म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर आक्रमण करण्यासाठी सरकारने टाकलेले पाऊल आहे. निवडणुकीच्या तोंडावर बनवाबनवी करून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक करण्याचे पाप मुख्यमंत्री महोदयांनी करू नये. ही बनवाबनवी ओबीसी आणि मराठा समाज सहन करणार नाही!”, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कठोर विरोध केला होता. मंत्री छगन भुजबळ यांच्या सर्वपक्षीय सभेतही विजय वडेट्टीवारांनी याबाबत जाहीर भूमिका घेतली होती.