नगर : निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील, प्रामुख्याने राजकीय क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱ्या १५ सहकारी बँकांपैकी पहिल्या टप्प्यात तीन बँकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होईल. निवडणूक घेण्यासाठी सहकार विभागाने अहमदनगर र्मचट सहकारी बँकेसह अहमदनगर शहर सहकारी बँकेकडून प्रारुप मतदारयाद्या मागवल्या आहेत. तसेच जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची प्रारुप मतदारयादी प्राप्त झाली असून त्यावर येत्या दि. ११ मेपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातच या तीन बँकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे.
जिल्ह्यात एकूण १७ नागरी सहकारी बँका निवडणुकीच्या प्रतीक्षेत होत्या. त्यातील अंबिका महिला सहकारी बँक व मातोश्री महिला सहकारी बँकेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. पुढील टप्प्यात अहमदनगर र्मचट बँक, शहर सहकारी बँक व जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक होईल. त्यानंतर गौतम बँक, कोपरगाव पीपल्स, साई संजीवनी, श्री. रुक्मिणी, िभगार अर्बन, संगमनेर र्मचट, अशोक, सैनिक, स्वामी समर्थ, अमृतवाहिनी, प्रवरा, मुळा आदी सहकारी बँकांच्या निवडणुका लागोपाठ होतील. या बँकांच्या संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपूर्वीच संपलेली आहे.
शहर सहकारी व अहमदनगर र्मचट या दोन्ही बँका प्रामुख्याने शहरातील व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांना वित्त पुरवठा करणाऱ्या आहेत. त्यामुळे या बँकांच्या निवडणूक हालचालींकडे नगरकरांचे लक्ष आहे. अहमदनगर र्मचट ही प्रामुख्याने व्यापारी बँक म्हणून ओळखली जाते तर शहर बँक प्रामुख्याने मध्यमवर्गीयांची बँक म्हणून ओळखली जाते. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची बँक म्हणून जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक ओळखली जाते.
प्राथमिक शिक्षक बँकेची प्रारूप यादी सहकार विभागाला प्राप्त झाली असून त्यामध्ये १० हजार ५०२ मतदार पात्र दाखवण्यात आले आहेत. या यादीवर हरकती व सुनावणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दि. ११ मेपर्यंत हरकती दाखल करता येतील. मात्र अद्याप एकही हरकत दाखल करण्यात आलेली नाही. हरकतींची सुनावणी झाल्यानंतर मतदार यादी अंतिम केली जाईल व त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक संघटना व त्यांची मंडळे हिरीरीने भाग घेतात. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळ ढवळून निघते. आगामी वर्षांच्या शाळा सुरू होण्याच्या वेळीच शिक्षक बँकेची निवडणूक रणधुमाळी सुरू होणार असल्याने त्याचा प्राथमिक शाळांवर काय परिणाम होणार याची चर्चा होत आहे. शहर सहकारी बँकेत माजी अध्यक्ष गिरीष घैसास व विद्यमान अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांची दोन्ही पॅनल एकत्र आल्याने विरोधी पॅनल कोणाचे असेल याकडे सभासदांचे लक्ष राहील. अहमदनगर र्मचट बँकेमध्ये संस्थापक संचालक हस्तिमल मुनोत यांची एकहाती सत्ता कायम आहे.
बाजार समित्यांच्या निवडणुका जुलैनंतर
विविध कार्यकारी सेवा संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेता येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने जिल्ह्यातील एक हजार २९० सोसायटय़ांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. यातील सुमारे ८५० सोसायटय़ांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित सुमारे ४५० सोसायटय़ांच्या निवडणुका जूनअखेपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल.