रत्नागिरी – कोकणातील शिमगा उत्सवात सादर होणाऱ्या पारंपरिक व पौराणिक लोकनृत्य पात्र संकासूर याचे चुकीचे आणि अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप करत झी ५ या मराठी ओटीटीवर प्रसारित होत असलेल्या ‘देवखेळ’ या वेबसीरिजवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात आमदार जाधव यांनी नमूद केले आहे की, संकासूर हे कोकणातील शिमगा उत्सवातील श्रद्धेचे, भक्तीमय व पारंपारिक पात्र असून त्याला शिवाचा अवतार मानले जाते. काळ्या रंगाचा पोशाख, मुखवटा आणि हातात वेत घेऊन गोमूसोबत गावोगावी फिरणारा संकासूर गावकऱ्यांना आशीर्वाद देतो. ही केवळ करमणूक नसून, शेकडो वर्षांची सांस्कृतिक परंपरा व लोकश्रद्धा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ३० जानेवारी २०२६ पासून झी ५ वर सुरू झालेल्या ‘देवखेळ’ या वेबसीरिजमध्ये संकासूरला क्रूर व खूनी प्रवृत्तीचे पात्र म्हणून दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे चित्रिकरण गुहागर तालुक्यात करण्यात आले असून, संकासूरवर डॉक्युमेंटरी तयार केली जात असल्याचे सांगून प्रत्यक्षात वेबसीरिजचे चित्रीकरण करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

या प्रकारामुळे गुहागर तालुक्यासह संपूर्ण कोकणात संतापाची भावना पसरली असून, नमन मंडळे, भजन मंडळांतील कलाकार तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात गुहागर पोलीस ठाण्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे आमदार जाधव यांनी नमूद केले आहे.

काळाच्या ओघात अनेक पारंपारिक कला लोप पावत असताना, कोकणातील कुणबी समाजाने नमन, भजन, संकासूर यांसारख्या लोककलांना जपून पुढील पिढीपर्यंत पोहोचवले आहे. अशा कलांना बदनाम करण्याचा प्रयत्न ‘देवखेळ’ या वेबसीरिजच्या माध्यमातून होत असल्याने जनभावना दुखावल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सिनेमास्टर्स प्रोडक्शन प्रा. लि. निर्मित ‘देवखेळ’ या वेबसीरिजवर तात्काळ बंदी घालावी, अशी ठाम मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.