गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या भुसुरुंग स्फोटात हुतात्मा झालेले गंगाखेड तालुक्यातील अंतरवेलीचे हवालदार लक्ष्मण कुंडलिकराव मुंडे यांच्यावर सोमवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गडचिरोलीतील चारमुशीजवळ नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात रविवारी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाची मोटार उडवून देण्यात आली. या स्फोटात ७ पोलीस शहीद, तर दोनजण गंभीर जखमी झाले. शहीद पोलिसांमध्ये परभणीच्या अंतरवेली येथील लक्ष्मण मुंडे यांचाही समावेश होता. मुंडे शहीद झाल्याचे कळताच अंतरवेलीवर शोककळा पसरली. शहीद मुंडे हे २०००मध्ये पोलीस दलामध्ये दाखल झाले, तेव्हापासून ते त्याच जिल्ह्यात नक्षलवादविरोधी पथकाच्या स्कोड सी ६० विभागात कर्तव्य बजावत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन बहिणी, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
सकाळी शहीद मुंडे यांचे पाíथव हेलिकॉप्टरमधून अंतरवेलीस आणण्यात आले. दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा पोलीस दलाने मानवंदना दिली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त अधीक्षक नियती ठाकर यांनी मुंडे कुटुंबीयांचे सात्वंन केले. तहसीलदार आदिनाथ िशगटे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्याच्या सर्वच क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
राज्य सरकार ७५ लाख देणार
दरम्यान, जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुंडे कुटुंबीयांना देण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले. पोलीस मुख्यालय सभागृहाला मुंडे यांचे नाव देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. राज्य सरकारच्या वतीने मुंडे कुटुंबीयांना ७५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असून, मुंडे यांना ते पोलीस सेवेत कार्यरत आहेत, असे समजून त्यांचे नियमित वेतन व बढती आदी बाबी ग्राह्य धरण्यात येऊन त्यानुसार त्यांचे वेतन देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.