सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने सोलापुरात पशुसंवर्धन विभागाच्या जनावरांच्या दवाखान्यात एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या ठिकाणी चिठ्ठी सापडली असून, त्यात सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने आणि कर्ज झाल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. नागनाथ दगडू शिंदे (वय ४८, रा. तेलगाव, ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोलापूरजवळील देगाव येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात शिंदे हे शिपाईपदावर सेवेत होते. सायंकाळी दवाखाना बंद झाल्यानंतर तेथे कोणीही नव्हते. दवाखान्याच्या भांडार खोलीत शिंदे यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने पशुवैद्यकीय अधिकारी आले असता दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले. तेव्हा शिंदे यांनी गळफास घेतल्यााचे दिसून आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने देगाव पोलीस चौकीशी संपर्क साधून घटनेची माहिती कळविली. आत्महत्या करण्यापूर्वी शिंदे यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच कर्जाचा डोंगर झाल्याने तो सहन करणे कठीण असल्याचा उल्लेख आहे.