Rohit Pawar alleges black magic and occult practices in Maharashtra politics for power : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जलद गतीने तपास व्हावा अशी मागणी रोहित पवारांसह अनेकांनी लावून धरली आहे. तसंच, या अपघाताबाबत महाराष्ट्रात एफआयआर दाखल करायला गेलेल्या रोहित पवारांना अडवण्यात आलं. महाराष्ट्रात एफआयआर दाखल करून घेतला गेला नाही. त्यामुळे त्यांनी थेट आता कर्नाटक गाठलं आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथील एका पोलीस ठाण्यात त्यांनी झिरो एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर आज त्यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी काळी जादू केला असल्याचाही दावा केला.
रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांच्या अपघाताबाबत योग्यरित्या तपास चालू नाही. अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना स्मरण पत्र द्यावं लागतंय. त्यावरही उत्तर दिलं जात नाही. सीआयडीचं काय चाललंय हेच माहीत नाही. महाराष्ट्रात दीड महिन्यात विविध ठिकाणी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी न्याय दिला नाही. मात्र कर्नाटकातील बंगळुरू येथील एका पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. कर्नाटकातील पोलीस प्रशासन अजित दादांना न्याय देण्याकरता सरसावले. कर्नाटकातील डीजीने हे प्रकरण महाराष्ट्रातील डीजींना पाठवलं आहे. महाराष्ट्रातील डीजी हे प्रकरण आता बारामती पोलीस ठाण्यात पाठवतील.” एका मराठी माणसाला न्याय देण्याकरता कर्नाटक पोलीस प्रशासनाने एफआयआर दाखल करून घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असंही ते म्हणाले.
जय पवारांनी पत्रकार परिषद का घेतली नाही?
अजितदादांच्या पक्षातील नेतेही गप्प आहेत, हे आम्हाला आम्हाला वाईट वाटतं. हे खरंतर हास्यास्पद आणि दुर्दैवी आहे. सुनील तटकरे, प्रफुल पटेलांचा दबाव असल्याने जय पवार पत्रकार परिषद घेत नसतील. आपल्या वडिलांना न्याय देण्यासाठी जय पवार प्रयत्न करत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांची पत्रकार परिषद होत नाही, तोवर माझ्याकडे असलेल्या पुराव्यांबाबत मी माझी पत्रकार परिषद घेणार नाही. पण गेल्या आठवड्यात होणारी पत्रकार परिषद आजपर्यंत का झाली नाही हे सांगता येणार नाही. सत्तेतील लोक त्यांना पत्रकार परिषद घेऊ देत नाहीयत का? असा प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केला.
अजित पवारांच पद जावं म्हणून काळी जादू
“अजित दादा जिवंत होते, तेव्हा बारामतीच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक झालेलं सर्वांनी पाहिलंय. मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेरही काळी जादू झाली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी करंगळी आणि अंगठ्याला कापलं आहे. काळ्या जादूमध्ये कोण कोण अडकलं आहे? अजितदादांची ताकद जावी आणि (इच्छूक) नेत्यांकडे ही ताकद यावी असा काळ्या जादूचा हेतू असावा. काळ्या जादूमागे काहीतरी हेतू असतो. तो कितीही फुसका असला तरीही कोणीही भीक घालत नाही. पक्षातील सर्वांत मोठं पद मिळावं, या हेतून दादांच्या घराबाहेर जादू केली का? त्यांच्या पक्षातील कोणते नेते भोंदूबाबाच्या मागे लागले होते हे बाहेर आलं पाहिजे, असंही रोहित पवार म्हणाले.
