आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या दरात होत असलेली घसरण तात्पुरती सुखद वाटली तरी दीर्घ मुदतीचा विचार करता. ही मंदीची निशाणी असल्याचे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. चिपळूण तालुक्यात सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेतर्फे कुबेर यांचा विद्यार्थी-प्राध्यापकांशी ‘मुक्त संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाा उत्तर देताना ते म्हणाले की, तेल हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग असून सौदी अरेबियासह मध्य-पूर्व आणि रशिया-अमेरिकेचेही हितसंबंध त्यामध्ये गुंतलेले आहेत. आपल्या देशात तेलाच्या आयातीचे प्रमाण लक्षात घेता तेलदरात १ डॉलर घट झाली तरी आपली सुमारे ८ हजार ५७८ कोटी रुपयांची बचत होते. पण हे चित्र तात्पुरते सुखद वाटले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मंदी वाढत असल्याची दुश्चिन्हे त्यातून दिसत आहेत. अनेक देशांचे अर्थसंकल्प तेलदराशी निगडित असून त्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त घट झाल्यास या देशांची अर्थव्यवस्था कोसळते. तेथील रोजगारनिर्मिती आणि उद्योग विस्ताराला घरघर लागते, असा अनुभव आहे. ही परिस्थिती पाहता २०१६ हे वर्ष आर्थिकदृष्टय़ा वादळी ठरण्याचा इशारा कुबेर यांनी दिला आहे. आपला देश महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहण्यात काही वावगे नसले तरी अन्य देशांच्या तुलनेत भारताची सध्याची स्थिती पाहता ते मृगजळच असल्याची टिप्पणी करून कुबेर म्हणाले की, रस्ते, आरोग्य, शिक्षण, उपयोजित शास्त्रीय संशोधन, पोलादनिर्मिती इत्यादी क्षेत्रांमध्ये आपण अजूनही खूप मागे आहोत. या संदर्भात वास्तववादी होण्यासाठी तौलनिक अभ्यासाची सवय आवश्यक आहे. त्यातूनच प्रगतीचे पुढील टप्पे गाठणे शक्य होईल. मात्र देशातील सध्याची व्यापार-उद्योगाची स्थिती पाहता युवकांनी रोजगाराची वाट न बघता स्वयंरोजगार किंवा नवीन व्यवसायाच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची गरज असल्याचा सल्ला कुबेर यांनी दिला. या कार्यक्रमापूर्वी संस्थेच्या कला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चित्र व शिल्प प्रदर्शनाला कुबेर यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांची मुक्त कंठाने प्रशंसा करून ते म्हणाले की, भौतिकवादी शिक्षणाच्या अतिरेकामुळे माणूस शिक्षित होऊनही तसा वागत नाही, असा अनुभव आहे. अशा वेळी त्याच्या शिक्षणाला कलांचीही जोड मिळायला हवी, असा विचार मानला जाऊ लागला आहे. त्यादृष्टीने या कला दालनातील विद्यार्थ्यांचे काम अप्रतिम असल्याचे मत कुबेर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी संस्थेत चालणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेतला.