scorecardresearch

VIDEO: “तुम्ही गद्दार आहात, एका डाकूबरोबर…”, बच्चू कडूंची गाडी आडवून वयोवृद्धाने झापलं

VIRAL VIDEO: एका वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंची गाडी आडवून त्यांना झापलं आहे.

bachchu kadu (2)
फोटो- screengrab/viral video

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही शिंदे गटात सामील झाले. यावरून एका वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंची गाडी आडवून त्यांना झापलं आहे. तुम्ही गद्दारी का केली? असा थेट सवाल वृद्धाने विचारला आहे.

बच्चू कडू यांनी नुकतंच धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी संबंधित वृद्ध व्यक्तीने गर्दीत घुसून बच्चू कडू यांना जाब विचारला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

हेही वाचा- राज्यपालांनी बोलावलेलं विशेष सत्रच बेकायदेशीर?, कोर्टातील युक्तिवादावर कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं विधान; म्हणाले…

संबंधित वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंचा हात पकडून , तुम्ही असे का वागायला लागले आहात, जरा नीट वागा… राज्यघटनेच्या चौकटीत वागा… जनतेला त्रास देऊ नका… अशा शब्दांत वृद्धाने बच्चू कडूंना जाब विचारला. यावेळी बच्चू कडू यांच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित वयोवृद्ध व्यक्तीला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वयोवृद्धाने म्हटलं, “ही गद्दारी नाही, तर गद्दारीचा बाप आहे का? यांचं वागणं नीट आहे का?” असे सवाल वयोवृद्धाने विचारलं.

यानंतर बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने घटनास्थळावरून काढता पाय काढला. पण वयोवृद्ध व्यक्ती गाडीच्या समोर आली. त्यांनी बच्चू कडूंना उद्देशून म्हटलं, “यांचं वागणं योग्य नाही. त्यांनी जनतेबरोबर गद्दारी केली. ते एका डाकूबरोबर गेले. बच्चू कडूंना ज्या धोरणाने निवडून दिलं. ज्या आशेनं निवडून दिलं, तसं ते वागत नाहीत. हे जे चाललं आहे, ते योग्य नाही, घटनाबाह्य आहे,” अशी प्रतिक्रिया संबंधित वयोवृद्ध व्यक्तीने दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 20:32 IST
ताज्या बातम्या