पावसाळा असो वा हिवाळा, भारतात दारूच्या लोकप्रिय ब्रँड्सना नेहमीच मोठी मागणी असते. विशेषतः ‘ओल्ड मंक’ सारख्या माफक दरात मिळणाऱ्या ब्रँडचा बाजारात मोठा खप आहे. मात्र, आता मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक मद्यप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘ओल्ड मंक’ बाटलीवरील दिशाभूल करणारी माहिती आणि कृत्रिम स्वादाच्या वापरावरून अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) या रमच्या विक्रीवर बंदी घातली होती.

या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने नकार दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दारूच्या दुकानांमध्ये ओल्ड मंक मिळण्यासाठी ग्राहकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टूडे’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखाड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने बाटलीवरील मजकुरावर तीव्र आक्षेप घेतला.

“७ वर्षे जुनी म्हणजे ७ वर्षे जुनीच असावी!”

ओल्ड मंकच्या बाटलीवर ‘७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ (7 years old blended) आणि ‘व्हेरी ओल्ड व्हॅटेड’ (Very old vatted) असा उल्लेख केलेला असतो. या शब्दांमुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. बाटलीतील सर्व मद्य हे सात वर्षे जुने (Aged) आहे, असा समज हा मजकूर वाचून ग्राहकांचा होऊ शकतो, याकडे खंडपीठाने लक्ष वेधले.

“तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहात. ७ वर्षे जुनी याचा अर्थ ती पूर्णपणे ७ वर्षे जुनीच असायला हवी!” अशा कडक शब्दांत प्रभारी मुख्य न्यायमूर्ती घुगे यांनी कंपनीची कानउघाडणी केली.

न्यायाधीशांनी न्यायालयातच भिंगाने पाहिली बाटली!

सुनावणीदरम्यान खंडपीठाने ओल्ड मंकच्या बाटलीचे पॅकेजिंग प्रत्यक्ष न्यायालयात तपासून पाहिले. विशेषतः बाटलीमध्ये कृत्रिम स्वाद (Added Flavours) मिसळल्याची माहिती कुठे दिली आहे, याचा शोध न्यायाधीशांनी घेतला.

यावर बोलताना न्यायमूर्ती घुगे म्हणाले, “मी भिंग वापरून पाहिले, तरीही मला ती माहिती सापडली नाही. मी बाटलीचा प्रत्येक कोपरा तपासला, पण अत्यंत बारकाईने लिहिलेली ती माहिती नजरेस पडली नाही.”

उत्पादक कंपनी ‘मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर प्रायव्हेट लिमिटेड’ची बाजू मांडताना वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी सांगितले की, ब्लेंडेड मद्याबाबत कायद्यात वेगळे नियम आहेत आणि नियमानुसारच सर्व माहिती लेबलवर दिली आहे. यावर न्यायालयाने टिप्पणी केली की, “देशातील प्रत्येक नागरिक इतका सुशिक्षित असावा, ज्यामुळे त्याला या तांत्रिक गोष्टी समजतील, अशी आमची इच्छा आहे.”

FSSAI चा मूळ आक्षेप काय?

अन्न सुरक्षा प्राधिकरणाने (FSSAI) दिलेल्या माहितीनुसार, न्यूट्रल स्पिरिटमध्ये (Neutral Spirit) कृत्रिम स्वाद मिसळल्यामुळे रमचा मूळ नैसर्गिक गुणधर्म बदलतो. अशा उत्पादनाला ‘रम’ म्हणून विकणे ग्राहकांची दिशाभूल करणारे आहे.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी प्राधिकरणाची बाजू मांडताना सांगितले की, रमचा खरा स्वाद आणि सुगंध हा ऊसाच्या मळीच्या नैसर्गिक प्रक्रियेतून (Fermentation) आला पाहिजे. परंतु, या उत्पादनात ९५ ते ९८ टक्के न्यूट्रल स्पिरिट आणि अवघी २ ते ५ टक्केच मूळ रम वापरली जाते. त्यामुळे याला ‘शुद्ध रम’ ऐवजी ‘रम फ्लेवर्ड स्पिरिट’ (Rum-flavoured spirit) म्हणून विकले जावे, असा युक्तिवाद एफएसएसएआयने केला.

दुसरीकडे, कंपनीच्या वकिलांनी असा आरोप केला की बाजारात इतर स्पर्धात्मक ब्रँड्सदेखील याच पद्धतीने मद्य तयार करतात, परंतु केवळ ओल्ड मंकलाच लक्ष्य केले जात आहे.

कंपनी लेबल बदलण्यास तयार; पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला

सुनावणीदरम्यान कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात सुधारित लेबल्स सादर केले आहेत. ‘७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ हा वादग्रस्त शब्द काढून टाकण्यास आणि कृत्रिम स्वादाची माहिती मोठ्या व ठळक अक्षरांत छापण्यास कंपनीने तयारी दर्शवली आहे.

न्यायालयाने FSSAI आणि राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाला या नवीन लेबल्सची पाहणी करून तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ११ सप्टेंबर रोजी होणार असून, त्यानंतरच ओल्ड मंक महाराष्ट्रात पुन्हा उपलब्ध होणार की नाही, यावर चित्र स्पष्ट होईल.