पावसाळा असो वा हिवाळा, भारतात दारूच्या लोकप्रिय ब्रँड्सना नेहमीच मोठी मागणी असते. विशेषतः ‘ओल्ड मंक’ सारख्या माफक दरात मिळणाऱ्या ब्रँडचा बाजारात मोठा खप आहे. मात्र, आता मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक मद्यप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘ओल्ड मंक’च्या बाटलीवरील दिशाभूल करणारी माहिती आणि कृत्रिम स्वादाच्या वापरावरून अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) या रमच्या विक्रीवर बंदी घातली होती.

हे उत्पादन ‘रम’ या नावाने विकता किंवा त्याचे विपणन (मार्केटिंग) करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयात घेतली आहे. या संदर्भातील वृत्त ‘हिंदूस्तान टाइम्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

उच्च न्यायालयात नक्की काय घडलं?

FSSAI च्या वकिलांनी गुरुवारी उच्च न्यायालयात सांगितले की, ओल्ड मंक तयार करताना ‘न्यूट्रल स्पिरिट’ आणि कृत्रिम रम फ्लेवरचा वापर केला जातो. त्यामुळे हे उत्पादन खऱ्या अर्थाने ‘रम’ या श्रेणीत मोडत नाही.

हे प्रकरण केवळ बाटलीवरील लेबलपुरते मर्यादित नसून, थेट उत्पादनाच्या मूळ स्वरूपाशी संबंधित आहे. त्यामुळे याला ‘रम’ म्हणून विकण्यास परवानगी देता येणार नाही, असा युक्तिवाद FSSAI ने केला. त्याऐवजी या उत्पादनाला ‘रम-फ्लेवर्ड स्पिरिट’ असे संबोधले जाऊ शकते, असा सल्लाही प्राधिकरणाने दिला आहे.

दरम्यान, ओल्ड मंकने आपल्या बाटल्यांचे नवीन लेबल न्यायालयात सादर केले असून, FSSAI ने या सुधारित लेबल्सची तपासणी करण्यासाठी न्यायालयाकडे अतिरिक्त वेळ मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

महाराष्ट्रातील बंदी आणि लेबलमधील बदल

न्यूट्रल स्पिरिटमध्ये कृत्रिम सुगंध आणि चव मिसळल्याचे आढळल्यानंतर FSSAI ने महाराष्ट्रात ओल्ड मंकच्या विक्रीवर बंदी घातली होती. या कारवाईनंतर कंपनीने आपल्या पॅकेजिंगमध्ये बदल करण्यास तयारी दर्शवली असून, बाटलीवर ‘ॲडेड फ्लेवर’ असे ठळकपणे छापण्यास सहमती दर्शवली आहे.

मद्य उत्पादकांवर FSSAI ची कडक कारवाई

केवळ ओल्ड मंकच नाही, तर अनधिकृत फ्लेव्हर्सचा वापर करणे, वयाबाबत खोटे दावे करणे आणि दिशाभूल करणारे लेबल लावणाऱ्या अनेक मद्य उत्पादकांविरोधात FSSAI ने मोहीम उघडली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, अनेक कंपन्या स्पिरिटमध्ये वरून कृत्रिम चव आणि सुगंध मिसळून ते अस्सल ‘रम’ किंवा ‘व्हिस्की’ असल्याचे भासवतात.

अशी उत्पादने केवळ निकृष्ट दर्जाची नसून ग्राहकांची दिशाभूल करणारी आहेत. त्यामुळे अशा पेयांना थेट ‘रम’ किंवा ‘व्हिस्की’ न म्हणता ‘रम-फ्लेवर्ड स्पिरिट’ किंवा ‘व्हिस्की-फ्लेवर्ड स्पिरिट’ असेच स्पष्ट नमूद करावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.