रत्नागिरी: राज्य पातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी झालेल्या रत्नागिरी तहसील कार्यालयातील ७१ कर्मचार्यांना तहसीलदारांनी शिस्तभंग केल्याबद्दल कारवाई का करु नये, अशी नोटीस पाठवली आहे.
जुन्या पेन्शनसह इतर काही प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी गेल्या मंगळवारपासून सुरु केलेल्या संपामुळे शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. या संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत कोणताच निर्णय न झाल्याने कर्मचार्यांमध्ये असंतोष आहे. यापूर्वीच्या सरकारनेही समिती गठित केली होती. परंतु त्यातून काहीच निर्णय लागला नाही. त्यामुळे पुन्हा समिती स्थापन करुन काहीच उपयोग होणार नाही. हा फक्त कर्मचार्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशी संपावरील कर्मचार्यांची भावना आहे.
आणखी वाचा- नागपूर : संपात सहभागी झालेल्या २१९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तहसील कार्यालयातील ७१ कर्मचार्यांना तहसीलदार शशिकांत जाधव यांनी व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवून प्रत्येक कर्मचार्याच्या नावाने शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. या कर्मचार्यांना पुन्हा कामावर हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. मात्र तहसील कार्यालयातील कर्मचार्यांनी हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा- बाराशेवर माजी आमदारांच्या कुटुंबांना मिळते ‘एवढी’ पेन्शन; संपकर्ते म्हणतात, “यांना गरज काय’’
संप पुकारला की सरकारकडून अशा प्रकारची कारवाईबाबत पत्रके काढण्यात येतात. अधिकारी वर्गाकडून त्याचे पालन केले जाते. ही प्रत्येक संप किंवा आंदोलनामध्ये प्रशासनाची कार्यपध्दती असते. त्यामुळे कारवाईच्या नोटीशीला कर्मचारी घाबरणार नाहीत, असे संघटनांच्या पदाधिकार्यांनी नमूद केले.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील महापुरुष मंदिरात झालेल्या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली. संपाच्या पहिल्या दिवशी कोणत्याही कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले नव्हते. त्यानंतर किती कर्मचारी कार्यालयात उपस्थित झाले, यावर त्या त्या विभागातील कर्मचार्यांनी माहिती दिली. कार्यालयात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नेतेमंडळींकडून करण्यात आले आहे.