सावंतवाडी : मालवण तालुक्यातील आचरा येथील ‘गोल्डन बीच’ पिरावाडी येथे निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कासवमित्र सूर्यकांत धुरी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या १०४ कासवांच्या पिलांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले.
आचरा समुद्रकिनारी कासव संवर्धनाची परंपरा सूर्यकांत धुरी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे. या हंगामात आचरा बीचवर कासवांनी मोठ्या प्रमाणात अंडी घातली असून, विणीच्या हंगामासाठी कासवांना हा किनारा सुरक्षित वाटत असल्याचे धुरी यांनी सांगितले.
या पिलांना समुद्रात सोडताना आचरा वनरक्षक प्राजक्ता पाटील, नितेश गितये, आचरा पोलीस ठाण्याच्या श्रीमती गौरी जाधव आणि पिरावाडी पोलीस पाटील सौ. तन्वी जोशी उपस्थित होत्या. तसेच प्राथमिक शाळा गाऊडवाडीचे मुख्याध्यापक राजेश भिरवंडेकर, सौ. गवळी मॅडम, अंगणवाडी सेविका कविता कुबल, वर्षा गावकर आणि शालेय विद्यार्थी या निसर्गाच्या विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार झाले.
या उपक्रमाबाबत बोलताना सूर्यकांत धुरी म्हणाले की, “चालू हंगामात आतापर्यंत अनेक पिलांना जीवनदान देण्यात यश आले आहे. आचरा समुद्रकिनारा कासवांच्या प्रजननासाठी अत्यंत पोषक ठरत आहे. या पिलांना सुरक्षितरीत्या समुद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”
स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या या संयुक्त पुढाकारामुळे कोकण किनारपट्टीवर सागरी जीवांच्या संवर्धनाला मोठी मदत होत आहे.
