राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावून देशाची प्रतिष्ठा उंचाविणाऱ्या नरसिंग यादव या ऑलम्पिकपटूने प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पदाच्या अंतिम लेखी परीक्षेत कॉपी केल्याचे उघड झाले आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतर्फे झालेल्या या परीक्षेदरम्यान अन्य प्रशिक्षणार्थीची उत्तरपत्रिका त्याच्याकडे सापडली. या कारणावरून यादवसह एकूण तीन प्रशिक्षणार्थी उपअधीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंना शासनाने थेट प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून नेमण्याचे धोरण स्वीकारले आहे. २०१० मध्ये आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू नरसिंग यादव सुवर्णपदक पटकावून प्रकाशझोतात आला. लंडन ऑलिम्पिकसाठीही त्याची निवड झाली होती. मूळचा उत्तर प्रदेशचा पण प्रदीर्घ कालावधीपासून मुंबईत वास्तव्यास असलेल्या नरसिंगला शासनाने पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवेत घेतले. तशीच संधी या प्रकरणात कारवाई झालेला भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार व अर्जुन पुरस्कारप्राप्त पंकज शिरसाठ यांनाही मिळाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वा शासनामार्फत थेट नियुक्त झालेल्या प्रशिक्षणार्थीना नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत वर्षभराचे प्रशिक्षण दिले जाते. वर्ष अखेरीस त्यांची लेखी परीक्षा होते. त्याअंतर्गत १७ जून रोजी झालेल्या ‘स्थानिक आणि विशेष कायदे’ परीक्षेत हा प्रकार घडला. प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक प्रश्नपत्रिका सोडवित असताना यादव याच्याशी बोलताना आढळले. पर्यवेक्षकांनी चौकशी करता यादवकडे प्रशिक्षणार्थी सुधीर खिरडकर यांची उत्तरपत्रिका आढळली. उत्तरे लिहिताना यादवने इतरांची मदत घेतल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र पोलीस अकादमीने तिघांवर कारवाई केली आहे. यादवला या विषयात अनुत्तीर्ण तरा उर्वरित परीक्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
खिरडकर व शिरसाठ यांना केवळ त्या विषयापुरते अनुत्तीर्ण करण्यात आले आहे.