पुणे/मुंबई/नवी दिल्ली : करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचे पुणे-पिंपरीमध्ये सात रुग्ण आढळले आहेत. त्यात नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तिघांसह त्यांच्या संपर्कातील तिघे आणि फिनलंडहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आठ झाली आहे.

नायजेरियातील ४५ वर्षीय महिला तिच्या बारा आणि अठरा वर्षांच्या मुलींना घेऊन २४ नोव्हेंबरला भावाला भेटण्यासाठी पिंपरी-चिंचवडला आली होती. त्यांची व निकटच्या संपर्कातील १३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात नायजेरियातून आलेल्या तिघींसह या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दीड व सात वर्षांच्या मुलीला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेने रविवारी सायंकाळी दिला. या सर्वाना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वाची प्रकृती स्थिर आहे. सहा जणांपैकी नायजेरियातून आलेल्या महिलेला सौम्य लक्षणे असून, अन्य पाच जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. या बाधितांपैकी तिघे १८ वर्षांवरील असल्याने त्यांनी करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या.

पुण्यातील करोनाबाधित प्रवासी १८ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत फिनलंडला गेला होता. त्याने लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

विमानतळांवर कठोर तपासणी

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी सुरू असून, रविवापर्यंत चार हजार ९०१ प्रवासी अतिजोखमीच्या देशांमधून आले. २३ हजार ३२० प्रवासी अन्य देशांतून आले आहेत. अतिजोखमीच्या देशांमधून आलेल्या सर्वाची, तर अन्य देशांमधून आलेल्या ५४३ जणांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. त्यापैकी नऊ प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत.

नियमपालनाचे आवाहन विषाणूंमध्ये उत्परिवर्तन होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ओमायक्रॉन विषाणूची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुखपट्टीचा वापर, अंतरनियमासह इतर नियम पाळावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राजस्थानच्या नऊ जणांसह देशभरात  २१ बाधित

नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले असून, राजस्थानमध्ये नऊ जणांना लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. तसेच टांझानियातून दिल्लीत आलेल्या ३७ वर्षांच्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली. सौम्य लक्षणे असलेल्या या रुग्णाला ‘एलएलजेपी’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील दोन, महाराष्ट्रातील आठ, गुजरात आणि दिल्लीतील प्रत्येकी एक आणि राजस्थानातील नऊ बाधितांमुळे देशातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या २१ वर पोहोचली आहे.