सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे-भालावल दशक्रोशीत ‘ओंकार’ हत्तीचे दुसऱ्यांदा आगमन झाले असून, या हत्तीने भालावल येथे गुरुवारी मध्यरात्री जोरदार धुमाकूळ घातला. या भागात हत्तीने केलेल्या हल्ल्यात विकास गुळेकर यांच्या मालकीच्या ‘अर्टिका’ गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हत्तीच्या या वावरामुळे संपूर्ण दशक्रोशीत पुन्हा एकदा भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ओंकार हत्ती भालावल गावात दाखल झाला. यावेळी त्याने आपला मोर्चा विकास गुळेकर यांच्या घराकडे वळवला. घराबाहेर उभी असलेली त्यांची अर्टिका गाडी हत्तीने अक्षरशः पलटविण्याचा प्रयत्न केला. हत्तीने दिलेल्या जोरदार धक्क्यांमुळे गाडीच्या दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले असून, काचाही फोडल्या आहेत. या हल्ल्यात गाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही सर्व थरारक घटना घराला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु हत्तीने थेट घरापर्यंत धडक मारल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन हत्तीचा बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
