​सावंतवाडी: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमावर्ती भागात वावरणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीने पुन्हा एकदा सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे परिसरात आपला मुक्काम ठोकला आहे. गोवा राज्यातील हणखणे मार्गे त्याने या परिसरात प्रवेश केला असून, काजू हंगामाच्या तोंडावर हत्तीच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

​सीमेवर ‘ओंकार’चा वावर:

काही महिन्यांपूर्वी गोवा राज्यातील मोपा विमानतळ परिसरात वावरलेला ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात परतला आहे. हणखणे (गोवा) हे गाव महाराष्ट्र-गोवा सीमेवर असून, याच मार्गाने ओंकारने नेतर्डे गावात शिरकाव केला आहे. सध्या सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात एकूण ६ हत्तींचा वावर आहे. यापैकी ओंकार हा एकटा नेतर्डे परिसरात आहे, तर इतर पाच हत्ती दोडामार्ग तालुक्यात सक्रिय आहेत.

​पकडण्याची प्रक्रिया लांबणीवर:

शासनाने ओंकार हत्तीला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एका न्यायालयीन याचिकेमुळे ही मोहीम सध्या लांबणीवर पडली आहे. तसेच, ‘वनतारा’ टीमने या हत्तीला पकडून नेण्यास स्थानिकांकडून काही अंशी विरोधही दर्शविला जात आहे. परिणामी, वन विभाग आणि प्रशासन यांच्यापुढील पेच वाढला आहे.

​शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान:

सध्या कोकणात काजूचा हंगाम सुरू आहे. बागांमध्ये काजू गोळा करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसमोर हत्तीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. हत्ती बागांचे नुकसान करत असल्याने आर्थिक फटका बसत आहेच, शिवाय जीवाचा धोकाही निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे सीमाभागातील शेतकऱ्यांची मोठी त्रेधातिरपीट उडत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.